वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील नियोजित वेळापत्रकानुसार तिसरी कसोटी 1 ते 5 मार्च दरम्यान धर्मशाळा येथे खेळवली जाणार होती पण आता या कसोटी सामन्याचे ठिकाण बदलणार असल्dयाचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. धर्मशालाच्या स्टेडियममधील मैदानाची पूर्ण तयारी झाली नसल्याने तिसरा सामना आता दुसऱ्या ठिकाणी खेळवला जाणार आहे.
या मालिकेतील नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा केवळ अडीच दिवसात मोठ्या फरकाने दणदणीत पराभव करून या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. धर्मशालाच्या खेळपट्टी आणि मैदानाची तयारी करण्याकरिता बीसीसीआयचे क्युरेटर तपोश चॅटर्जी यांनी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या या स्टेडियमला भेट दिली. त्यांनी खेळपट्टी आणि मैदानाचे निरीक्षन केले आणि दरम्यान हे मैदान सामना खेळवण्यास अद्याप सुसज्ज नसल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआयचे क्युरेटर लवकरच या स्टेडियमच्या खेळपट्टी आणि मैदानाचा आपला निरीक्षण अहवाल बीससीआयकडे सादर करणार आहे. धर्मशालातील या सामन्याला आता केवळ 16 दिवस बाकी राहिले असून येथील हवामान कदाचित सामन्यात अडथळा आणू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी धर्मशालातील खेळवण्यात आलेले काही आंतरराष्ट्रीय सामने खराब हवामानामुळे वाया गेले होते. या मालिकेतील तिसरी कसोटी कदाचित बेंगळूर किंवा विशाखापट्टणम येथे खेळवली जाईल असा अंदाज आहे. लवकरच या संदर्भात बीसीसीआयकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.









