सहावी-सातवीसाठी स्कर्टऐवजी चुडीदारला प्राधान्य
प्रतिनिधी/ बेळगाव
मुलींचे वाढते वय पाहता शिक्षण विभागाने ड्रेसकोडमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आठवी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना गणवेश म्हणून चुडीदार दिला जात होता. आता सहावीपासून पुढील इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना चुडीदार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा पद्धतीने कापड उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सरकारी शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना राज्य सरकारकडून गणवेश दिला जातो. प्रतिवर्षी शाळा सुरू झाल्यापासून पहिल्या पंधरा दिवसांत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. शाळा सुरू होण्यास मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने कापड उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू आहे. बेंगळूर येथील गोडावूनमधून बेळगाव शिक्षणाधिकारी गोडावूनमध्ये पुस्तके, तसेच गणवेशाचे कापड टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे.
विद्यार्थिनींचे वाढते वय लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने ड्रेसकोडमध्ये बदल केला आहे. सहावी व सातवी इयत्तांमधील विद्यार्थिनींना चुडीदार गणवेश दिला जाणार आहे. मागील वर्षीपासून या इयत्तांमधील विद्यार्थिनींना स्कर्ट दिला जात होता. परंतु, यावर्षीपासून दोन जोड चुडीदार दिले जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कापड उपलब्ध करून देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून कंत्राटदाराकडून कापड उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार असला तरी गणवेश शिवण्याचा खर्च पालकांनाच करावा लागणार आहे. सध्या पुरवठादार ठरवण्याचे काम सुरू असून एकाच गुणवत्तेचे कापड विद्यार्थी व विद्यार्थिनींना मिळेल, यासाठी तयारी सुरू आहे. नव्या अध्यादेशाची प्रत प्रत्येक जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांना राज्य सरकारने पाठविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









