बेळगाव : बेंगळूर-बेळगाव सुपरफास्ट एक्स्प्रेस विनाकारण हुबळी येथे तासभर थांबविली जात होती. यामुळे एक्स्प्रेस बेळगावला पोहोचण्यास विलंब होत होता. याबद्दल प्रवाशांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली. कारण नसतानाही एक्स्प्रेस थांबविली जात असल्याने लोकप्रतिनिधींनीही रेल्वे अधिकाऱ्यांकडे संताप व्यक्त केला. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडले असून यापुढे हुबळी रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस तासभर थांबविली जाणार नाही.
रेल्वे लवकर पोहोचणार
नैर्त्रुत्य रेल्वेने नवे वेळापत्रक जाहीर केले असून त्यामुळे एक्स्प्रेस सकाळी 6.45 वाजता बेळगाव रेल्वेस्थानकात दाखल होणार आहे. नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बेळगाव एक्स्प्रेसच्या गतीमध्येही वाढ केली जाणार असल्याने तब्बल तासभर रेल्वे लवकर पोहोचणार आहे.









