टी-20 मध्ये दोन वर्षात 9 कॅप्टन : नवा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून देखील शानदार कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था /मुंबई
महान क्रिकेटपटू कपिल देव, विजय मर्चंट, सुनील गावसकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाने शानदार कामगिरी साकारत अनेक स्पर्धेत यश संपादन केले. या महान खेळाडूंच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेकवेळा प्रतिस्पर्धी संघाना धुळ चारत मोठे विजय संपादन केले. दुसरीकडे गेल्या काही वर्षापासून ज्या टी-20 क्रिकेटची चर्चा सुरु आहे, त्यामध्ये मात्र मागील दोन वर्षात भारतीय संघाला तब्बल 9 कर्णधार मिळाले आहेत. या दोन वर्षात विराट कोहली ते सूर्यकुमार यादव असा भारतीय संघाचा प्रवास राहिलेला आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत बीसीसीआयने सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. यामुळे कर्णधार या नात्याने सूर्यकुमारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दोन वर्षात बदलले तब्बल आठ कर्णधार
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या समाप्तीनंतर लगेचच भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना संधी दिली आहे. सूर्यकुमार हा आता भारतीय टी-20 संघाचा नववा कर्णधार असणार आहे. मागील दोन वर्षात तब्बल आठ कर्णधार भारतीय संघाला मिळाले आहेत, हे विशेष. अर्थात 2021 पासूनची यादी पाहिली, तर अव्वलस्थानी विराट कोहलीचे नाव आहे. 2021 मध्ये विराटने टी-20 संघाचे नेतृत्व करताना एकूण 10 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात संघाला 6 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचा स्वीकारावा लागला आहे.
विराटनंतर दुसऱ्या स्थानी शिखर धवन आहे. त्याने फक्त 3 सामन्यात संघाचे नेतृत्व केले, त्यात त्याला 1 सामना जिंकता आला, तर 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने 2021 ते 2022 भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करताना 32 सामने खेळले. त्यातील 24 सामन्यात संघाला विजय, तर 8 सामन्यात पराभव पत्करावा लागला. याशिवाय रिषभ पंत, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाचे नेतृत्व करताना कमी अधिक प्रमाणात यश मिळवले आहे. आता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी सूर्यकुमार कर्णधार असणार आहे. टी 20 मध्ये तो भारताचा नववा कर्णधार असेल. सहाजिकच वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेदरम्यान त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. याशिवाय, जबाबदारीचे ओझे पेलताना आपले कर्तुत्व दाखवण्याची नामी संधी त्याच्याकडे असणार आहे.
टी 20 मध्ये भारतीय कर्णधारांची कामगिरी
- कर्णधार वर्ष सामने विजय पराभव अनिर्णीत रद्द
- विराट 2021 10 6 4 0 0
- धवन 2021 3 1 2 0 0
- रोहित 21-22 32 24 8 0 0
- रिषभ 2022 5 2 2 0 1
- हार्दिक 22-23 16 10 5 1 0
- केएल 2022 1 1 0 0 0
- बुमराह 2023 2 2 0 0 0
- ऋतुराज 2023 3 2 0 0 1
- सूर्यकुमार 2023 – – – – –









