वृत्तसंस्था/ लॉस एंजेलिस
भारतीय-अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज, अँबियंट किंवा चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम अरेना येथे रविवारी रेकॉर्डिंग अकादमीने आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या संगीत पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. आपले सहकारी दक्षिण आफ्रिकेचे बासरीवादक वॉटर केलरमन्स आणि जपानी सेलो वादक एरू मात्सुमोतो यांच्यासोबत टंडन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चंद्रिका टंडन ही पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांची मोठी बहीण आहे. चेन्नईमध्ये जन्मलेल्या या संगीतकाराने ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर भारतातही आनंद व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टंडन यांचे विशेष अभिनंदन केले आहे.









