वृत्तसंस्था /बेंगळूर
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या आगामी चांदयान प्रक्षेपणाचे दर्शन लोकांना प्रत्यक्षरित्या घडविण्याची योजना सज्ज केली आहे. यासाठी प्रक्षेपणाच्या स्थानावर लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. चांद्रवाहनाचे प्रक्षेपण करणाऱ्या एलव्हीएम-3 या यानाच्या दर्शनासाठी आपली नोंदणी करण्याचे आवाहन लोकांना इस्रोकडून करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
14 जुलैला श्रीहरीकोटा येथून चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सतीश धवन अवकाश केंद्रावरुन ते करण्यात येईल. सर्वकाही यथासांग पार पडले तर 23 किंवा 24 ऑगस्टला या यानाचा लँडर चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. हा चांद्रयान दोन या अभियानाचाच विस्तार आहे. त्या अभियानात चांद्रयान शेवटच्या क्षणी कोलमडले होते. त्यामुळे ते अभियान अयशस्वी झाले. त्यानंतर इस्रोने नव्याने सज्जता केली आहे. मागच्या वेळच्या चुका यावेळी टाळण्यात आल्या आहेत. तसेच अधिक आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या अभियानाची योजना करण्यात आली आहे. परिणामी, हे अभियान यशस्वी होईल, अशी इस्रोला आशा आहे.









