संग्राम काटकर, कोल्हापूर
Ganesh Utsav Kolhapur : गणेशोत्सव जसा जवळ येत आहे तसे शहर गणेशमय होऊ लागले आहे. वर्गणी जमवण्यापासून ते बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसह सजिव, प्रबोधनात्मक आणि तांत्रिक देखाव्यांसाठी मोठे मंडप उभारण्याला सार्वजनिक मंडळांनी सुरूवात केली आहे. गणेश आगमनाच्या दाटून आलेल्या उत्साहाच्या भरात एकत्र येत असलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांत लोकजीवनाशी संबंधीत देखावे करण्याबाबत चर्चा रंगत आहेत. शाहूपुरी व्यापारी पेठेतील शाहूपुरी युवक मंडळाने तर गणेशभक्तांची गर्दी खेचण्यासाठी देशाचा स्वाभिमान बनलेल्या चांद्रयान-मोहिमेवर आधारीत तांत्रिक देखावा करण्याचे पक्के केले आहे. या देखाव्यातून इस्त्रोमधून हवेत रॉकेट कसे झेपावले, विक्रम लॅण्डरने चंद्रावर कसे केले सॉफ्ट लॅण्डींग हे दाखवण्यासाठीचे वातावरण बनवले जाणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष रमेश पोवार यांनी सांगितले.
याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून सोशल मिडीयाद्वारे घराघरात पोहोचलेल्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती शाहूपुरीतील राधा-कृष्ण तरूण मंडळ ट्रस्टकडून उभारण्यात येणार आहे. मोठा मंडप उभारून त्याला केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीचा लुक आणला जात आहे. शिवाय याच प्रतिकृतीत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापनाही केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मोठ्या मंडप उभारणीला सुरूवात केली आहे, असे मंडळाचे अध्यक्ष कपिल चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील बहुतांश मंडळांनी गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी खास लोखंडी मंडप बनवून घेतले आहेत. नटबोल्टच्या सहाय्याने हे मंडप उभारले जात आहेत. त्यामुळे मंडळांना खोदकामासाठी दोन-तीन दिवस करावे लागणारे परीश्रम थांबले आहेत. एकीकडे गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या भरात मोठे रस्ते, गल्ली, बोळात मंडप उभारण्याची धांदल सुरू असली तरी मंडळांना अग्निशमन दलाचा बंब, रूग्णवाहिका व केएमटी बस विना अडथळा ये-जा करेल इतक्या आकाराचा रस्ता मोकळा ठेवावा लागणार आहे. जे मंडळ रस्ता मोकळा सोडणार नाही, त्यांना महापालिका व पोलीस प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सरप्राईज ठरेल असा देखावा उभारणार…
गणेशोत्सव काळात सर्वाधिक गर्दी खेचणाऱ्या राजारामपुरी दुसरी गल्ली येथील राजारापपुरी शिवाजी तरूण मंडळाने गणेशोत्सवात केल्या जाणाऱ्या तांत्रिक देखाव्या बाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. मात्र गणेशोत्सव काळात राजारामपुरीत येणाऱ्या गणेशभक्तांना सरप्राईज ठरेल, असा देखावा आम्ही उभा करणार आहोत, असे मंडळाचे अध्यक्ष विलास मुदगल यांनी सांगितले.
स्वच्छता अभियान…
शहरात दिवसें-दिवस कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनत आहे. यावर प्रकाश टाकणारा राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील एकता मित्र मंडळाकडून देखावा उभारला जाणार आहे. स्वच्छता अभियान असे देखाव्याचे नाव आहे. या देखाव्यातून शहरातील कचऱ्याची वस्तुस्तिथी दाखवली जाणार आहे. शिवाय मंडळाजवळ एलईडी क्रीन उभारून त्याच्या माध्यमातून कचऱ्याबाबतची माहिती ही दिली जाणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष रहिम सनदी यांनी सांगितले.
मतदान करा…पण विकू नका…
अभ्यासपूर्ण देखावे मांडून गणेशभक्तांची गर्दी खेचणाऱ्या जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरूण मंडळाने नगरसेवक, विधानसभा व लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक देखावा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या मंडळाकडून चक्क मतदान करत असलेला गणपती अशा गणेशमूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तसेच या गणेशमूर्ती समोर मतदान करा पण पैसे घेऊन आपले मत विकू नका अशा आशयाचा तांत्रिक देखावा करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष मेघराज पाटील यांनी सांगितले.
सजीव देखावेही ठरणार लक्षवेधी…
राजारामपुरी चौथ्या गल्लीतील जय मराठा तरूण मंडळाकडून बाळूमामा हा तांत्रिक व पाचव्या गल्लीतील विवेकानंद मित्र मंडळाकडून स्वराज्यनिष्ठा हा छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या जीवनात आधारीत सजीव देखावा केला जाणार आहे. या दोन्ही देखाव्यांसाठी तब्बल 60 ते 70 फुट मंडळ उभारणीचे काम सुरू आहे.








