इस्रो अध्यक्षांची माहिती : चंद्रावर पाचव्यांदा तिरंगा फडकवण्याची तयारी
वृत्तसंस्था/ चेन्नई
केंद्राने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाकांक्षी चांद्रयान-5 मोहिमेला अलिकडेच मान्यता दिली आहे. हे अभियान जपानच्या अंतराळ संस्थेच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी येथे दिली. चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल चेन्नई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चांद्रयान-5 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनाचा रोव्हर पाठवला जाणार आहे. इस्रोच्या या चांद्रयान मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार आहे. 2008 मध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-1 ने चंद्राचे रासायनिक, खनिज आणि फोटो-भूगर्भीय मॅपिंग केले. चांद्रयान-2 मोहीम (2019) 98 टक्के यशस्वी झाली होती. चांद्रयान-2 वर बसवलेला हाय रिझोल्यूशन कॅमेरा अजूनही शेकडो छायाचित्रे पाठवत आहे. चांद्रयान-3 ही मोहीम चांद्रयान-2 चा पुढचा भाग असून ती चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे लँडिंग आणि कक्षेत फिरण्याची पूर्ण क्षमता प्रदर्शित करत आहे.
इस्रोकडे भविष्यकालीन मोहिमा
चंद्रावरून गोळा केलेले नमुने परत आणण्याच्या उद्देशाने चांद्रयान-4 मोहीम 2027 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-5 मोहिमेमध्ये भारताला जपानची साथ मिळणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. त्याव्यतिरिक्त गगनयानसह विविध मोहिमांवर भारतीय शास्त्रज्ञ सध्या काम करत आहेत. भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजनाही सध्या प्रगतीपथावर आहे.









