इस्रोची घोषणा : 23-24 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट-लँडिंगचा प्रयत्न
वृत्तसंस्था /बेंगळूर
भारताची महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-3’ मोहीम 14 जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाण्याची महत्त्वपूर्ण घोषणा गुरुवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुऊवारी केली. इस्रोचे नवीन हेवीलिफ्ट प्रक्षेपण वाहन एलव्हीएम-3 ही मोहीम पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे. आता मोहीमेची तयारी अंतिम टप्प्यात असून यशस्वी प्रक्षेपणानंतर 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट-लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. ‘चांद्रयान-3’चे लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले तर भारत असे करणारा चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे.
‘चांद्रयान-3’चे प्रक्षेपण आता 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 वाजता करण्याचे नियोजित आहे, असे ट्विट इस्रोच्या अध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळी केले. यापूर्वी बुधवारी इस्रोने एक व्हिडीओ जारी करत मोहीमेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले होते. बुधवार, 5 जुलैला चांद्रयान-3 अंतराळयान त्याच्या नवीन प्रक्षेपण रॉकेट ‘एलव्हीएम-3’शी संलग्न करण्यात आले. यावषी मार्चमध्ये चांद्रयान-3 अंतराळ यानाने आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या होत्या. या चाचण्यांदरम्यान प्रक्षेपणावेळी येणाऱ्या कठीण परिस्थितीच्या कसोटीवर शास्त्रज्ञांना यश आले होते. चांद्रयान-2 नंतर चांद्रयान-3 या महिन्यात चंद्राच्या पृष्ठभागावर उपकरणे सुरक्षितपणे उतरवण्यासाठी आणि शोध उपक्रम राबविण्यासाठी प्रक्षेपित होणार आहे. या मोहिमेचे संपूर्ण बजेट 651 कोटी ऊपये आहे. या मोहिमेत भारत चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवणार आहे. या लँडरसोबत एक रोव्हर असून ते चंद्राच्या पृष्ठभागावर फिरताना तेथे काही प्रयोग करणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या खडकांच्या वरच्या थरातील थर्मोफिजिकल वैशिष्ट्यो, चंद्रावरील भूकंपांची वारंवारता, तेथील प्लाझ्मा वातावरण आणि रचना यांचा अभ्यास करण्यासाठी उपकरणे पाठवली जाणार असून ह्या मोहिमेत यश मिळण्याची आशा भारताला आहे.









