कक्षा बदलण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण : आणखी तीन डी-ऑर्बिटिंग कक्षांची प्रतिक्षा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताचे चांद्रयान-3 अंतराळयान बुधवारी चंद्राच्या अधिक जवळ पोहोचल्याची माहिती इस्रोने दिली. चांद्रयान-3 यानाने चंद्राची कक्षा बदलण्याची प्रक्रिया बुधवारी दुपारी यशस्वीपणे पूर्ण केली. आता चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचले आहे. 5 ऑगस्ट रोजी अंतराळयानाने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यापासून त्याच्या हालचाली अचूकपणे सुरू असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.
चांद्रयान-3 आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ येत असल्याचे इस्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे. चांद्रयान-3 ची कक्षा कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे अंतर आता 174 किमी गुणिले 1,437 किमी झाले आहे. आता वाहनाची चंद्र कक्षा बदलण्याशी संबंधित ऑपरेशन 14 ऑगस्ट रोजी 11.30 ते 12.30 दरम्यान असेल. ही मोहीम जसजशी पुढे जाईल तसतसे चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आणखी खाली आणण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.
15 जुलै रोजी चांद्रयान-3 ने पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. यानंतर 17 जुलै रोजी चांद्रयानने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत आणि 18 जुलै रोजी पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. यानंतर, 20 जुलै रोजी चंद्रयानने पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत आणि 25 जुलै रोजी पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भारताच्या बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान-3 यानाचे पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेच्या दिशेने यशस्वी प्रक्षेपण केले. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत ठेवण्यात आले. यानंतर इस्रोने चांद्रयान-3 मधून काढलेली अनेक छायाचित्रेही शेअर केली आहेत. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता मिशन श्रीहरिकोटा केंद्रातून निघाले. आता सर्व काही योजनेनुसार झाले तर ते 23 ऑगस्ट रोजी अंतराळयान चंद्रावर उतरेल. तत्पूर्वी अजून तीन डी-ऑर्बिटिंग कक्षा या यानाला पूर्ण कराव्या लागणार आहेत.
‘विक्रम’ लँड होण्यास सक्षम : इस्रो अध्यक्ष
इस्रोसाठी विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा स्थिती विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरित्या लँड होण्यास सक्षम असल्याचे इस्रोच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी ‘चांद्रयान-3 – इंडियाज प्राइड स्पेस मिशन’ या विषयावरील चर्चासत्रात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चंद्राच्या कक्षेत पोहोचली असून आता चांद्रयान-3 च्या इंजिनमध्ये बिघाड झाला किंवा त्याचे सेन्सॉर गेले तरी विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास सक्षम असणार आहे. त्याची रचनाच विशिष्ट पद्धतीने करण्यात आल्यामुळे आता काहीही झाले तरी चांद्रयान-3 हे चंद्रावर उतरणार असल्याचा विश्वास डॉ. एस. सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे.









