इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात : 13 जुलै रोजी प्रक्षेपण
वृत्तसंस्था / श्रीहरिकोटा
इस्रोची बहुप्रतिक्षित मोहीम चांद्रयान-3 प्रक्षेपणाच्या अंतिम टप्प्यात आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर इस्रो 13 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित केले जाणार आहे. अलीकडेच इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या माहिमेतून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार असून भारताला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता इस्रोने बुधवार, 5 जुलै रोजी एक व्हिडिओ ट्विट करत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील पूर्वतयारीची माहितीही जारी केली.
इस्रोने जारी केलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3च्या लँडरमध्ये चार पेलोड आहेत, तर सहाचाकी रोव्हरमध्ये दोन पेलोड आहेत. चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरचे नाव चांद्रयान-2च्या लँडर आणि रोव्हरप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चांद्रयान-3च्या लँडरचे नाव ‘विक्रम’ असे असून ते भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावर आहे. तर, रोव्हरचे नाव ‘प्रज्ञान’ असे ठेवण्यात आले आहे.
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. या मिशनमध्ये अल्गोरिदम सुधारण्यात आले आहेत. आतापर्यंत जगातील सर्व देशांनी चंद्रावर आपली वाहने पाठवली आहेत, ती चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरली आहेत, परंतु चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी चांद्रयान-3 ही पहिली अंतराळ मोहीम असेल. काही वर्षांपूर्वी, इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-2 देखील उतरवले होते, परंतु शेवटच्या काही मिनिटांत संपर्क तुटल्याने मोहीम अयशस्वी झाली होती.
चांद्रयान-3 या वषी जुलैमध्ये प्रक्षेपित केले जाणार असल्याची मोठी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी मे महिन्याच्या अखेरीस केली होती. ‘चांद्रयान-3’चे प्रक्षेपण ‘चांद्रयान-2’च्या लँडर-रोव्हरच्या अपघातानंतर चार वर्षांनी जाहीर करण्यात आले आहे. चांद्रयान-3 मोहीम जुलैमध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सूर्याच्या वैश्विक किरणांपासून संरक्षित असलेल्या चंद्राच्या अंधाऱ्या बाजूला प्रक्षेपित होण्याची अपेक्षा आहे. कारण हा भाग पृथ्वीच्या समोर येत नाही.
चांद्रयान-2 मोहीम 2019 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर या तीन वेगवेगळ्या यंत्रणांचे हे मिशन अद्वितीय संयोजन होते. ऑर्बिटरने निर्दोषपणे काम करत स्वत:ला चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापित केले. मात्र, लँडर आणि रोव्हर युनिट चंद्राच्या दूरच्या बाजूला क्रॅश झाल्याने ते गमवावे लागले. भारतीय अंतराळ संस्था तिच्या किफायतशीर दृष्टिकोनासाठी ओळखली जाते. आता चांद्रयान-3 समवेत फक्त एक लँडर आणि एक रोव्हर प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उद्देश नवीन चंद्र मोहिमेसाठी चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा पुनर्वापर करण्याचा आहे.









