Eknath Shinde : इस्त्रोच्या चांद्रयान 3 ची मोहीम आज यशस्वी झाली. विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्रावर पोहचल्यावर देशाच्या कानाकोपऱ्यात यशाचा आनंद भारतीयांनी व्यक्त केला. याचबरोबर गावोगावी युवकासह आबालवृद्धांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. ‘भारत माता की जय’ अशा जयघोष करत आनंद व्यक्त केला आहे. “मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे”, असा संदेश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताच चांद्रयान-3 ने पाठवला आहे. या आनंदात सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, चांद्रयान 3 या मोहिमेमध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, ज्यांनी-ज्यांनी यामध्ये सभाग घेतला, योगदान दिलं त्यांच मनापासून अभिनंदन. त्यांना खूप खूप शुभेच्छा. या चांद्रयानाला पाठिंबा देणारे देशाचे पंतप्रधान यांचे मनापासून आभार मानले. देश महासत्तेकडे जात असताना चांद्रयान 3 ही मोहिम यशस्वी होऊन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दक्षिण ध्रुवावर पोहचणारा आपला पहिला देश आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.








