ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेंगळूरच्या मुख्यालयात इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. मोहिम यशस्वी केल्याबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ म्हणून संबोधलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मोदी म्हणाले, चांद्रयान 3 या मिशनने चंद्राचं रहस्य उलगडेल. सोबतच पृथ्वीवरील समस्यांचंही निराकरण केलं जाईल. स्पेस मिशनच्या टच डाऊन पाँईंटला एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपलं चांद्रयान उतरलं आहे, भारताने त्या जागेच्या नामकरणाचा निर्णय घेतला आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपलं चंद्रयान उतरलं. त्या स्थानाला ‘शिवशक्ती’ या नावाने ओळखलं जाईल. शिवमध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे.
चांद्रयान 2 उतरलेल्या जागेचंही नामकरण
दरम्यान, 4 वर्षांपूर्वी चांद्रयान 2 ज्या ठिकाणी उतरलं होतं. त्या जागेचंही नामकरण करण्यात आलं आहे. त्या जागेला ‘तिरंगा’ नावाने ओळखले जाईल. हा तिरंगा पाँइंट आपल्याला शिकवण देईल की कोणतंही अपयश शेवटचं नसतं. जर दृढ इच्छाशक्ती असेल तर यश प्राप्त होतंच. म्हणजेच, चांद्रयान 2 चे पदचिन्ह आहे ती जागा तिरंगा नावाने ओळखली जाईल.









