भ्रमंतीच्या वेगासह व्याप्तीत हळूहळू वाढ
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारताची अंतराळ मोहीम ‘चांद्रयान-3’ने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. इस्रोने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. ‘चांद्रयान-3’ने रविवारी पृथ्वीच्या पहिल्या कक्षेतून दुसऱ्या कक्षेत झेप घेतली होती. आता उद्या म्हणजेच मंगळवारी ‘चांद्रयान-3’ पुन्हा तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल.
सध्या ‘चांद्रयान-3’ पृथ्वीपासून 41,603 किमी × 226 किमी अंतरावर असलेल्या कक्षेत फिरत आहे. या मोहिमेतील पूर्वनियोजनानुसार पृथ्वीभोवती पाचवेळा भ्रमंती केल्यानंतर ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. सध्या दुसऱ्या कार्यकक्षेत असलेल्या यानाची फिरण्याची क्षमता आणि व्याप्ती हळूहळू वाढवली जात आहे.
इस्रोने 14 जुलै रोजी ‘चांद्रयान-3’ मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली. भारताची ही तिसरी चांद्रमोहीम असून या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-3’ यशस्वीपणे उतरवण्याची भारताची योजना आहे. जर भारत यात यशस्वी झाला तर भारत असे करणारा जगातील चौथा देश बनेल. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीननेच ही कामगिरी केली आहे.









