शेवटचे डीबूस्टिंगही यशस्वी, आता इस्रोकडून सॉफ्ट लँडिंगची तयारी
वृत्तसंस्था/ बेंगळूर, नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी पहाटेच्या सुमारास चांद्रयान-3 मोहिमेचे दुसरे आणि अंतिम डीबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. इस्रोने चांद्रयान-3 चा वेग कमी करून चंद्राच्या जवळच्या कक्षेत पाठवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता मॉड्यूलची अंतर्गत चाचणी तपासल्यानंतर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार असल्याची माहिती इस्रोकडून रविवारी देण्यात आली.
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान-3 आता चंद्रापासून केवळ 25 किलोमीटरच्या कक्षेत फिरत आहे. याआधी शुक्रवारी चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने एक डीबूस्टिंग प्रक्रिया पार पाडली. तसेच गुरुवारी प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या विभक्त झाल्यानंतर ते अखेरच्या कक्षेत उतरले होते. आता विक्रम लँडर हळूहळू आपला वेग कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार आहे. ‘चांद्रयान-3’साठी अखेरचे 24 तास अतिमहत्वाचे आहेत. सध्या विक्रम लँडर योग्य पद्धतीने चंद्राच्या दिशेने जात असल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने दिली आहे.

चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ आणण्यासाठी अंतिम डीबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्याने चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. डीबूस्टिंग ही चांद्रयानची गती कमी करून त्याला एका कक्षेत ठेवण्याची प्रक्रिया आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असून तो रविवारी पहाटे पूर्ण करण्यात आला. आता विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेचा सर्वात जवळचा बिंदू (पेरील्यून) 25 किमी आहे. तर सर्वात दूरचा बिंदू (अपोलो) 100 किमी आहे. आता मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केल्यानंतर सॉफ्ट लँडिंगची अचूक आणि निर्धोक वेळ साधण्याचा प्रयत्न इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून केला जाणार आहे.
आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी प्रक्षेपित केल्यानंतर चांद्रयान-3 ने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आता इस्रो चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मोहीम फत्ते झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. भारताच्या यशस्वी चंद्र मोहिमेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या स्थितींचा अभ्यास केला जाणार आहे. हे यश भारतीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, त्यामुळे अंतराळ संशोधनात भारताची प्रगती दिसून येईल, असे इस्रोने स्पष्ट पेले आहे.
3.84 लाख किलोमीटरचा प्रवास
चांद्रयान-3 हे अंतराळयान 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट एलव्हीएम-3च्या माध्यमातून यशस्वीरित्या अवकाशात झेपावले होते. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान-3 मोहिमेतील आतापर्यंतचे सर्व टप्पे ठरल्याप्रमाणे पार पडले आहेत. आता ते अंतिम टप्पा पूर्ण करून मोहीम फत्ते करेल अशी आशा इस्रोच्या शास्त्रज्ञांना आहे. चांद्रयान-3 चे ‘सॉफ्ट लँडिंग’ हा एक संस्मरणीय क्षण असल्यामुळे केवळ त्याची उत्सुकता वाढवण्याबरोबरच आमच्या तऊणांच्या मनात शोधाची आवड देखील जागृत करेल, असे इस्रोने म्हटले आहे.
सॉफ्ट लँडिंगच्या वेळेत बदल
23 ऑगस्ट, सायंकाळी 6 वाजून 04 मिनिटे
इस्रोने चांद्रयान-3 मिशनच्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या वेळेत बदल केला आहे. विक्रम लँडर आधी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्रावर उतरणार होते, परंतु इस्रोने वेळ थोडीफार पुढे सरकवल्यामुळे आता बुधवार, 23 ऑगस्ट रोजी ते 17 मिनिटांच्या विलंबाने म्हणजेच संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याचे इस्रोने रविवारी सांगितले. इस्रो स्पेस एजन्सीने ट्विटरवर पोस्ट करून लँडिंगची वेळ जाहीर केली आणि लोकांच्या शुभेच्छा आणि सकारात्मकतेबद्दल आभार मानले.
थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी
‘चांद्रयान-3’ सॉफ्ट लँडिंगमध्ये यशस्वी होताना संपूर्ण देशाला पाहायचे आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून दाखविले जाणार आहे. इस्रोची वेबसाईट, इस्रोचा युट्यूब चॅनेल, फेसबुक पेज आणि डीडी नॅशनल चॅनेल यासह अनेक प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. तसेच विविध वृत्तवाहिन्यांवर जाणकार आणि तज्ञांच्या विश्लेषणासह या मोहिमेचे वृत्तांकन केले जाणार आहे. चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग आपल्या बेंगळूर येथील पॅम्पसमध्ये थेट प्रसारित करण्यासाठी इस्रोने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. हे प्रसारण पाहण्यासाठी देशभरातील विविध शाळा आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी व शिक्षकांना सोयीनुसार आमंत्रित केले आहे.









