पृथ्वीभोवती फिरण्याची कार्यकक्षा हळूहळू वाढवणार
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटास्थित सतीश धवन अंतराळ केंद्रावरून शुक्रवार, 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करण्यात आले. आता चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत सुस्थितीत असून ते पृथ्वीच्या कक्षेत फिरत असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. जवळपास 40 दिवसांच्या यशस्वी वाटचालीनंतर हे यान 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. जर सर्व काही ठीक झाले तर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.47 वाजता त्याचे सॉफ्ट लँडिंग होईल, असे इस्रोने सध्या जाहीर केले आहे. मात्र, त्यात किरकोळ बदल संभवू शकतो. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचे लक्ष लागले आहे.
क्रायोजेनिक इंजिनासह चांद्रयान-3 पृथ्वीच्या बाह्य कक्षेत पोहोचले आहे. हळूहळू चांद्रयान कक्षा आणि वेग वाढवत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. आता भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचे शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केले जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. चांद्रयानमधील लँडरचे नाव ‘विक्रम’ आणि रोव्हरचे नाव ‘प्रज्ञान’ आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. यापूर्वी चांद्रयान-2 च्या लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किमी आधी संपर्क तुटला होता. आता ही नवी मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ संपूर्ण यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
पहिला टप्पा 100 टक्के यशस्वी : एस. उन्नीकृष्णन नायर
विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांनी या मोहिमेच्या पुढील वाटचालीबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान पृथ्वीपासून कसे दूर नेले जाईल याबाबतही त्यांनी सविस्तर सांगितले. आतापर्यंत वाहन प्रणालींनी खूप चांगली कामगिरी केली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 100 टक्के यशस्वी झाला आहे. ‘चांद्रयान-3’च्या प्रक्षेपणानंतर काही वेळातच रॉकेट एलव्हीएम3-एम4 पासून यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले.









