शुक्रवारपर्यंत कापले जवळपास तीन चतुर्थांश अंतर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
चांद्रयान-3 ने शुक्रवारपर्यंत जवळपास तीन चतुर्थांश अंतराचा पल्ला पार केला आहे. म्हणजेच चंद्रापर्यंतचा सुमारे 75 टक्के प्रवास अंतराळयानाने पूर्ण केला आहे. आता शनिवारी, 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अंतराळयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार असल्याची माहिती इस्रोने शुक्रवारी दिली. चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर काही दिवस चंद्राभोवती फिरत-फिरत 23 ऑगस्टला हे वाहन चंद्रावर उतरणार आहे.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी 1 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता चांद्रयान-3 ट्रान्सलुनर इंजेक्शन प्रणालीद्वारे पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवले होते. यापूर्वी चांद्रयान लंबवर्तुळाकार कक्षेत पृथ्वीभोवती फिरत होते. अखेरच्या टप्प्यात त्याचे पृथ्वीपासून किमान अंतर 236 किमी आणि कमाल अंतर 1,27,603 किमी होते. ट्रान्सलुनर इंजेक्शनसाठी इस्रोच्या बेंगळूर येथील मुख्यालयातील शास्त्रज्ञांनी काही काळ चांद्रयानचे इंजिन सुरू केले. चांद्रयान पृथ्वीपासून 236 किमी अंतरावर असताना इंजिन फायर करण्यात आले. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून ते चंद्राकडे सरकत आहे.
इस्रो शास्त्रज्ञांचे बारकाईने लक्ष
चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर इस्रोला अधिक बारकाईने लक्ष ठेवत अनेक डावपेच करावे लागणार आहेत. चांद्रयान-3 मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहेत. अंतराळयानाला 100 किमी उंचीवर नेऊन 17 ऑगस्टला लँडिंग मॉड्यूल विभक्त केले जाईल. तर, 23 ऑगस्ट रोजी भारताचे अंतराळयान चंद्रावर उतरणार आहे. तेथे 14 दिवसांपर्यंत त्यांच्याकडून प्रयोग केले जातील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या किरणोत्सर्गाचे अध्ययन करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कशाप्रकारे होतात याचा शोध या मोहिमेद्वारे इस्रो घेणार आहे. तसेच चंद्रावरील पृष्ठभागाचेही अध्ययन केले जाणार आहे.









