23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इस्रोच्या वैज्ञानिकांनी मंगळवारी चांद्रयान-3 ची पाचवी अन् अखेरची अर्थ बाउंड ऑर्बिट रेजिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. चांद्रयान आता 127607 गुणिले 236 किलोमीटरच्या कक्षेत आहे. याचा अर्थ चांद्रयान अशा अंडाकृती कक्षेत फिरत आहे, जी पृथ्वीपासून किमान 236 किलोमीटर अंतरावर तर कमाल 127609 किलोमीटरवर आहे.
यापूर्वी 20 जुलै रोजी चांद्रयानची कक्षा 71351 किमी गुणिले 233 किमीची करण्यात आली होती. अंतराळयान आता 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री स्लिंग शॉटद्वारे पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने वाटचाल करणार आहे. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. तर 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरणार आहे.
चांद्रयान-3 मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर उतरणार आहेत. तेथे 14 दिवसांपर्यंत त्यांच्याकडून प्रयोग केले जातील. प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या किरणोत्सर्गाचे अध्ययन करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कशाप्रकारे होतात याचा शोध या मोहिमेद्वारे इस्रो घेणार आहे. चंद्रावरील मातीचेही अध्ययन केले जाणार आहे.
चांद्रयान-3 चा आतापर्यंतचा प्रवास
14 जुलै रोजी चांद्रयान-3 ला 170 किमी गुणिले 36500 किमीच्या कक्षेत सोडण्यात आले.
15 जुलै रोजी पहिल्यांदा कक्षा वाढवून 41762 किमी गुणिले 173 किमी करण्यात आली.
17 जुलै रोजी दुसऱ्यांदा कक्षा वाढवून 41603 किमी गुणिले 226 किमी करण्यात आली.
18 जुलै रोजी तिसऱ्यांदा कक्षा वाढवून 51400 किमी गुणिले 228 किमी करण्यात आली.
20 जुलै रोजी चौथ्यांदा कक्षा वाढवून 71351 किमी गुणिले 233 किमी करण्यात आली.
25 जुलै रोजी पाचव्यांदा कक्षा वाढवून 127609 किमी गुणिले 236 किमी करण्यात आली.
31 जुलै अन् 1 ऑगस्टच्या रात्रीदरम्यान पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने वाटचाल करणार
मोहिमेतून काय साध्य होणार?
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि रोव्हरला तेथे संचालित करण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचे भारत या मोहिमेद्वारे जगाला दाखवून देणार आहे. अंतराळ क्षेत्रातील मोहिमांकरता जगाचा भारतावरील विश्वास यामुळे वाढणार आहे. भारताने स्वत:चे हेवी लिफ्ट लाँच व्हेईकल एलव्हीएम3-एम4 द्वारे चांद्रयान प्रक्षेपित केले आहे. या प्रक्षेपकाची क्षमता यापूर्वीच सिद्ध झाली आहे. काही दिवसांपूर्वी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची कंपनी ब्ल्यू ओरिजिनने इस्रोच्या एलव्हीएम3 रॉकेटच्या वापराकरता स्वारस्य दाखविले होते. ब्ल्यू ओरिजिन एलव्हीएमचा वापर वाणिज्यिक अन् पर्यटनाच्या उद्देशासाठी करू इच्छित आहे. एलव्हीएमद्वारे ब्ल्यू ओरिजिन स्वत:च्या क्रू कॅप्सूलला प्लॅन्ड लो अर्थ ऑर्बिट अंतराळ स्थानकापर्यंत नेणार आहे.









