नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्राच्या धान खरेदी धोरणाविरोधात तेलंगणा सरकारने दिल्लीत धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवीन कृषी धोरणावर चोवीस तासात उत्तर देण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास देशभरात निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱयांच्या भावनेशी खेळू नका, सरकार पाडण्याची ताकद आपल्यात असल्याचा दावाही त्यांनी केला. या आंदोलनात बीकेयूचे नेते राकेश टिकैत यांच्यासह तेलंगणाचे खासदार, आमदार आणि इतर नेतेही सहभागी झाले होते. तेलंगणा भवन येथे हे धरणे आंदोलन होत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला खुले आव्हान दिले आहे. लवकरात लवकर नवीन कृषी धोरण आणा, नाहीतर आम्ही तुम्हाला सत्तेतून हटवू, असे म्हटले आहे. केसीआर यांनी शेतकऱयांना एमएसपी देण्याची मागणी केली. त्यासाठी संपूर्ण देशातील नेते जोडले जातील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान आमचा अपमान करत असल्याचा आरोप करत भात पिकवणे गुन्हा आहे का? असा सवालही त्यांनी केला. तसेच शेती कॉर्पोरेटला द्यावी आणि शेतकरी नोकऱया करू लागले, अशा धोरणावर सरकार काम करत असल्याची टीकाही राव यांनी केली.
2014 मध्ये तेलंगणात सत्तेवर आल्यानंतर टीआरएसची दिल्लीतील ही पहिली निषेध रॅली आहे. पक्षाचे खासदार, आमदार, सर्व कॅबिनेट मंत्री आणि शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी तेलंगणा भवन येथे बसलेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले aaa.









