पुणे / प्रतिनिधी :
रोहित बाबा, एका महिला केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात घुसून गोंधळ घालणे, अंडी फेकणे हे कुठल्या संस्कृतीत बसते, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात सोमवारी गोंधळ झाला. कार्यक्रमस्थळी भाजपा व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडल्याने राडा झाला. या वेळी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यास भाजपा कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरला झाला. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली होती. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला आहे. आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली होती. त्याला चंद्रकांतदादांनी ट्विट करीत उत्तर दिले.
एका महिला केंद्रीय मंत्र्यांच्या पक्ष कार्यक्रमात घुसून गोंधळ घालणे, अंडी फेकणे वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसते हे जरा सांगाल? वयाने आणि अनुभवाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनीच ही संस्कृती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली, की त्यामागे दुसराच हात आहे, असा प्रश्न चंद्रकांतदादांनी याद्वारे केला. या ट्विटमध्ये ‘हात’ शब्द कोट करून पाटील यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवरही निशाणा साधला.








