पुणे / प्रतिनिधी :
मागील काही दिवसांपासून पुण्याचे दादा कोण? अशा चर्चा रंगल्या असतानाच त्याचा पुढचा अध्याय पाहायला मिळाला. चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला येण्यापूर्वीच अजित पवारांनी कार्यक्रम सुरू केल्याने अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा कुरघोडीचे राजकारण घडल्याच्या चर्चा रंगल्या.
अल्पबचत भवन येथील जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला यायच्या आधीच अजित पवारांनी कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम सुरू केल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनीही मिश्कील भाषेत अजित पवारांवर टीका केली.
कार्यक्रमाची वेळ दहा वाजताची होती. कार्यक्रमास उशीर होत असल्याने अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांसाठी न थांबता कार्यक्रमास सुरुवात केली. अजित पवारांनी भाषणदेखील सुरू केले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा कुरघोडीचे राजकारण घडल्याच्या चर्चा रंगल्या. या वेळी अजित पवारांनी उपस्थितांना आरोग्याचे सल्लेदेखील दिले. वेळेत उठा, चांगल्या सवयी लावा, कामाला लवकर सुरुवात करा, कार्यक्रमास वेळेत पोहोचा. उगीच ढेरी सुटलीय असे नको, हा सल्ला माझ्यासह सगळय़ांना आहे, असे ते म्हणाले. मात्र, याच कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उशिरा पोहोचले होते. त्यामुळे त्यांनादेखील अजित पवार बोलले असावेत, अशाही चर्चा रंगल्या.
अजित पवारांच्या भाषणाला मी मम् म्हणतो
ओरखडा न येऊ देता, चिमटा काढायचा, असा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या सूचनेचे पालन करावे. अजितदादांना भाषणातून जे सांगायचे होते, तेच मलाही सांगायचे आहे. अजित पवारांच्या भाषणाला मम् म्हणतो, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.