वृत्तसंस्था / कोलकाता
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी निराशाजनक झाली. तत्पूर्वी केकेआर संघाने 2024 साली आयपीएल चषकावर आपले नाव कोरले होते. केकेआर संघाला मुंबईचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज चंद्रकांत पंडीत प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभला होता. या संघाबरोबर त्याचा दोन वर्षांसाठी प्रशिक्षक म्हणून करार झाला होता. हा करार संपुष्टात आल्याने केकेआरच्या फ्रांचायझींनी चंद्रकांत पंडीत हे पद सोडणार असल्याची घोषणा केली.
चंद्रकांत पंडीतच्या मार्गदर्शनाखाली 2024 साली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल चषकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले होते. पण 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत केकेआर संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली. त्यांना स्पर्धेच्या गुणतक्त्यात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. केकेआरच्या खराब कामगिरीची खंत बाळगून चंद्रकांत पंडीतने प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला. यापुढे आपण केकेआर संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहणार नसल्याचे त्याने जाहीर केले. केकेआर संघाला 2024 साली आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी चंद्रकांत पंडीतचे योगदान महत्त्वाचे होते. केकेआर संघ अधिक बलवान करण्यामध्ये त्याचा वाटा महत्त्वाचा ठरला होता.
2023 साली केकेआरच्या प्रमुख प्रशिक्षकपदी चंद्रकांत पंडीतची नियुक्ती करण्यात आली होती. 2023 साली प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर केकेआर संघाने आयपीएल स्पर्धेत सातवे स्थान मिळविले होते. दरम्यान 2024 साली दुखापतीमुळे कर्णधार श्रेयस अय्यरला संपूर्ण आयपीएल स्पर्धा हुकली होती. 2024 साली श्रेयस अय्यरचे पुन्हा संघात आगमन झाल्यानंतर या संघाचे मेंटर गौतम गंभीरच्या उपस्थितीत केकेआरने आयपीएल चषक जिंकला होता.









