ऑनलाईन टीम/तरुण भारत
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे २२ आमदार सरकारमध्ये येण्यासाठी तयार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त करत प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या टिकेनंतर खैरे यांनी आपले विधान मागे घेतले आहे. सोबतच दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. कोणाचे मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, मी फक्त सावध करण्यासाठी असे बोललो होतो असे खैरे म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये, असे प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, नाना पटोलेंच्या नाराजी नंतर चंद्रकांत खैरे यांनी आमदारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, काँग्रेसचे 22 आमदार देवेंद्र फडणवीस फोडणार असल्याचा उल्लेख काल आमच्या भाषणात आला होता. मुळात ही बातमी खूप जुनी आहे. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे म्हणून असे मी बोललो होतो. परंतु आमचे मित्र नाना पटोले यांची माझ्या विधानामुळे नाराजी झाली आहे. म्हणून त्यांची नाराजी दूर करतो. तसेच भाजप फोडणार आणि काँग्रेसचे आमदार जाणार असे म्हणण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळे माझे वक्तव्य मागे घेत आहे. तसेच कोणाचे मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही खैरे म्हणाले. महाविकास आघाडीत वाद होऊ नयेत यासाठी आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचं देखील खैरे म्हणाले.