कोल्हापूर : “आपल्या देशात तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शिक्षणाच्या माध्यमातून राज्याचा व देशाचा विकास साधण्यावर शासनाचा भर आहे” असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. ते सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालय, कोल्हापूर आणि इंडो काऊन्ट फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिह्यातील आश्रमशाळांना शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) सुपूर्द सोहळा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी इंडोकाऊंट इंडस्ट्रीजचे डायरेक्टर कमल मित्रा, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, राज्य शासनाने अभियांत्रिकी तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे मराठीकरण करण्याचे काम पूर्ण केले असून त्या पुस्तकांचे विमोचन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईत होणार आहे. भविष्यात वैद्यकीय शिक्षणसुध्दा मराठीतूनच उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता कौशल्यावर आधारीत शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी ई-लर्निंग साहित्याचा वापर करुन विविध क्षेत्रात ज्ञान मिळवावे तसेच संशोधनामध्येही अग्रेसर रहावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रास्ताविकामध्ये बोलताना सहायक आयुक्त विशाल लोंढे म्हणाले, “विमुक्त जाती, भटक्या जमाती मधील कुटूंबे ही उदरनिर्वाहासाठी सतत एका ठिकाणाहून दुस्रया ठिकाणी भटकत असतात. तसेच अत्यंतिक गरीब परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलामुलींना शिक्षण देता येत नाही. दुर्बल घटकातील मुलामुलींचा शैक्षणिक विकास व्हावा व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी राज्य शासनाने आश्रमशाळा सुरु केल्या आहेत. विजाभज समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. शिक्षण घेऊन या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या या आश्रमशाळा मोलाचे कार्य करीत आहेत.”
शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) दिल्याबद्दल कमल मित्रा यांचा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केले.