वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेदेप प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीने 9 सप्टेंबर रोजी 371 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. याच्या विरोधात चंद्राबाबू नायडूंच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या असून यावर बुधवारी सुनावणी झाली आहे. आंध्र उच्च न्यायालयाने एससीबी न्यायालयाच्या कार्यवाहीवर अंतरिम स्थगिती दिली आहे. तसेच सीआयडीला 18 सप्टेंबरपर्यंत नायडू यांना ताब्यात न घेण्याचा आदेश दिला आहे. परंतु तोपर्यंत नायडू हे न्यायालयीन कोठडीत राहणार असून याप्रकरणी पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.
नायडू यांना अटक झाल्याने त्यांचे समर्थक सातत्याने निदर्शने करत आहेत. तेदेपच्या एका कार्यकर्त्याने विशाखापट्टणम येथे जाणाऱ्या विमानात निदर्शन केले आहे. अदारी किशोर नावाच्या व्यक्तीने विमानाच्या आत ‘लोकशाही वाचवा’ असा मजकूर असलेला फलक झळकविला आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी या इसमाला विमानतळावर अटक केली आहे.

चंद्राबाबू यांच्या अटकेच्या विरोधात तेदेपने राज्यात बंद पुकारला होता. तर पक्ष कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शन केली आहेत. तर सत्तारुढ वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेवरून आनंद व्यक्त केला आहे. 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बेरोजगार युवांना कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या अंतर्गत आंध्रप्रदेश स्टेट स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली होती.
या महामंडळाच्या 3,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी तत्कालीन चंद्राबाबू यांच्या सरकारने सीमेन्स इंडस्ट्री सॉफ्टवेअर इंडिया लिमिटेड आणि डिझाइन टेक सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ग्रुप कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराच्या अंतर्गत सीमेन्स इंडस्ट्री सॉफ्टवेअर इंडियाला कौशल्य विकासासाठी 6 एक्सिलेंन्स सेंटर स्थापन करायचे होते.
राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली नव्हती. तरीही कुठल्याही निविदेशिवाय प्रकल्प सुरू करण्यात आला होता. करारानुसार सीमेन्स कंपनीला प्रकल्पात गुंतवणूक करावी लागणार होती, परंतु कंपनीने कुठलीच गुंतवणूक केली नसल्याचे सीआयडीला चौकशीत आढळून आले होते. याउलट राज्य सरकारकडून वितरित 371 कोटी रुपये विविध शेल कंपन्यांमध्ये वाटण्यात आले होते. याकरता बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले होते. 2018 मध्ये याप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार करण्यात आली होती.









