वृत्तसंस्था/ गॅले
पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर लंकेने दुसऱया डावात 9 बाद 329 धावा जमवित एकूण 333 धावांची मिळविली आहे. दिनेश चंडीमल 86 धावांवर खेळत असून त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. लंकेच्या दुसऱया डावात ओशादा फर्नांडो आणि कुशल मेंडीस यांनीही अर्धशतके झळकविली.
या कसोटीत लंकेचा पहिला डाव 222 धावांत आटोपल्यानंतर पाकने पहिल्या डावात 218 धावा जमविल्या. लंकेला केवळ 4 धावांची आघाडी पहिल्या डावात मिळाली. त्यानंतर लंकेने 1 बाद 36 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. नाईट वॉचमन रजिता 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर ओशादा फर्नांडो आणि कुशल मेंडीस यांनी तिसऱया गडय़ासाठी 91 धावांची भागिदारी केली. ओशादा फर्नांडोने 125 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 64 धावा झळकविल्या. यासीर शहाने ओशादा फर्नांडोला बाद केल्यानंतर लंकेचा अँजेलो मॅथ्यूज 9 धावांवर तंबूत परतला. कुशल मेंडीसने 126 चेंडूत 9 चौकारांसह 76 धावा जमविल्या. यासीर शहाने त्याचा त्रिफळा उडविला. लंकेची यावेळी स्थिती 5 बाद 178 अशी होती.
दिनेश चंडीमलच्या चिवट फलंदाजीमुळे लंकेला दुसऱया डावात 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. धनंजय डिसिल्वा आणि चंडीमल यांनी सहाव्या गडय़ासाठी 40 धावांची भर घातली. डिसिल्वाने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. डिक्वेलाने 2 चौकारांसह 12,. रमेश मेंडीसने 2 चौकारांसह 22 तर महेश तिक्षणाने 11 धावांचे योगदान दिले. दिनेश चंडीमल दिवसअखेर 121 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 86 धावांवर खेळत आहे. लंकेने दुसऱया डावात 96 षटकात 9 बाद 329 धावा जमवित पाकवर 333 धावांची आघाडी मिळविली आहे. पाकतर्फे मोहम्मद नवाज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 88 धावात 5 तर यासीर शहाने 122 धावात 3 व हसन अलीने 1 गडी बाद केला.
या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून हा सामना निकाली होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. अंधुक प्रकाशामुळे तिसऱया दिवसाचा खेळ निर्धारित वेळेपेक्षा अगोदर पंचांनी थांबविला. गेल्या आठवडय़ात ऑस्टेलिया विरुद्धच्या कसोटीत दिनेश चंडीमलने नाबाद 206 धावा झळकावून आपल्या संघाला ही कसोटी मालिका बरोबरीत सोडवून दिली होती. लंकेच्या ओशादा फर्नांडोचे कसोटीतील हे सहावे अर्धशतक आहे.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव सर्वबाद 222, पाक प. डाव सर्वबाद 218, लंका दु. डाव 96 षटकात 9 बाद 329 (चंडीमल खेळत आहे 86, कुशल मेंडीस 76, ओशादा फर्नांडो 64, करुणारत्ने 16, डिसिल्वा 20, डिक्वेला 12, रमेश मेंडीस 22, महेश तिक्षणा 11, मोहम्मद नवाज 5-88, यासीर शहा 3-122, हसन अली 1-15).









