वृत्तसंस्था/ कोलंबो
येथे सुरु असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी दिनेश चंडिमलच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर यजमान लंकेने ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 67 धावांची आघाडी मिळविली आहे. चंडिमल 118 धावांवर खेळत असून कर्णधार करुणारत्ने, कुशल मेंडीस, मॅथ्यूज आणि कमिंदू मेंडीस यांनी अर्धशतके झळकवली. लंकेने पहिल्या डावात दिवसअखेर 6 बाद 431 धावा जमविल्या.
दोन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी तीन दिवसात जिंकून लंकेवर आघाडी मिळविली आहे. या दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 364 धावांवर समाप्त झाला. त्यानंतर लंकेने 2 बाद 184 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांनी दिवसअखेर 6 बाद 431 धावांपर्यंत मजल मारली.
कर्णधार करुणारत्नेने कुशल मेंडीस समवेत दुसऱया गडय़ासाठी 152 धावांची भागिदारी केली होती. तिसऱया दिवसाच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर कुशल मेंडीस लियॉनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 161 चेंडूत 9 चौकारांसह 85 धावा जमविल्या. मेंडीस बाद झाल्यानंतर मॅथ्यूज आणि चंडिमल यांनी चौथ्या गडय़ासाठी 83 धावांची भर घातली. मॅथ्यूजने 117 चेंडूत 4 चौकारांसह 52 धावा जमविल्या. स्टार्कने त्याला झेलबाद केले. नंतर दिनेश चंडिमलने कमिंदू मेंडीससमवेत पाचव्या गडय़ासाठी 133 धावांची भागिदारी केल्याने लंकेला पहिल्या डावात आघाडी मिळवता आली. कमिंदू मेंडीसने 7 चौकारांसह 61 धावा जमविल्या. स्वेप्सनने त्याचा त्रिफळा उडविला. डिक्वेलाने 5 धावा जमविल्या. दिवसअखेर चंडिमल 232 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 118 तर रमेश मेंडीस 7 धावांवर खेळत होते. लंकेने पहिल्या डावात 149 षटकात 6 बाद 431 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क, लियॉन आणि स्वेप्सन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्टेलिया प. डाव ः सर्वबाद 364, लंका प. डाव ः 149 षटकात 6 बाद 431 (चंडीमल खेळत आहे 118, करुणारत्ने 86, कुशल मेंडीस 85, अँजेलो मॅथ्यूज 52, कमिंदू मेंडीस 61, निशांका 6, डिक्वेला 5, रमेश मेंडीस खेळत आहे 7, स्टार्क 2-47, लियॉन 2-160, स्वेप्सन 2-90).