बेळगाव : रामदुर्ग येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत मुलींच्या विभागात जीजी चिटणीस संघाने प्राथ-माध्य गटात विजेतेपद पटकाविले. तर मुलांच्या विभागात चंदरगी स्पोर्ट्स हॉस्टेल संघाने विजेतेपद पटकाविले आहे. रामदुर्ग येथील चंदरगी स्पोर्ट्स हॉस्टेलच्या मैदानावरती घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत प्राथ. मुलींच्या गटात अंतिम फेरीत जी. जी. चिटणीस संघाने सेंट जॉन काकती संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. चिटणीसतर्फे आरूशी बसुर्तेकरने विजयी गोल केला. माध्यमिक मुलींच्या गटात अंतिम सामन्यात जी. जी. चिटणीस संघाने काकतीच्या सेंटजॉन संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. चिटणीसतर्फे संचीता मलिकने गोल केला.
मुलांच्या विभागात उपांत्यफेरीच्या सामन्यात एम. आर. भंडारी बेळगाव संघाने सेंटजॉन काकती संघाचा 2-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरी स्पोर्टस हायस्कूल चंदरगी संघाने एम. आर. भंडारीचा 9-0 असा पराभव केला. तर माध्यमिक गटात अंतिम सामन्यात चंदरगी स्पोर्ट्स हॉस्टेने एम. आर. भंडारी संघाचा 6-0 असा पराभव केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते चिटणीस, स्पोर्टस हॉस्टेल चंदरगी, सेंटजॉन काकती, एम. आर. भंडारी संघाना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंदरगी स्कूल व रामदुर्गच्या क्रीडा शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.









