चांदर-कावरें ग्राम विकास समितीचा निर्णय : विरोधी पक्षनेत्याकडून पंचायतीचा गौरव
मडगाव : भोज काळापासून कदंबांच्या काळापर्यंत राजधानी म्हणून काम पेलेल्या आत्ताचे ‘चांदोर’, पूर्वीचे ‘चंद्रपुरा’ गावचा गोव्यातील वारसा स्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय चांदर-कावरें ग्राम विकास समितीने घेतला आहे. काल चांदर-कावरें ग्राम विकास समितीने चांदरला वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी चर्चासत्र आयोजित केले होते. चांदर-कावरें पंचायतीच्या ग्राम विकास समितीने आपल्या सुंदर चांदरला ‘वारसा स्थळ’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून कृती आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे हे कौतुकास्पद आहे. चांदर-कावरें पंचायत ही चांदरला ‘वारसा स्थळ’ म्हणून विकसित करणारी गोव्यातील एक आदर्श पंचायत ठरेल, अशा शब्दात कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी चांदर-कावरें ग्रामपंचायतीचा गौरव केला आहे. या चर्चासत्राला वास्तूविशारद डिन डिक्रूझ व हेता पंडित, इतिहास संशोधक प्रजल साखरदांडे, माजी व विद्यमान पंचायत सदस्य व चांदर गावांतील रहिवासी यांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन मौल्यवान सूचना व कल्पना मांडल्या.
आजच्या परिसंवादात वास्तुविशारद हेता पंडित, वास्तुविशारद डिन डिक्रूझ आणि इतिहासकार प्रजल साखरदांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हेता पंडित, डिन डिक्रूझ हे आवर्जुन उपस्थित राहिल्याने विरोधी पक्षनेत्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चर्चासत्रात भाग घेवून स्थानिक ग्रामस्थांनी ठोस अशा सूचना केल्या. शेवटी ग्रामविकास समिती लोकांचा सुचनेनुसारच आराखडा तयार करणार आहे. लोकांचा सहभाग लाभल्याने आराखड्याची अंमलबजावणी सुरळीत आणि संघर्षाशिवाय होणार आहे. तऊण आणि स्थानिकांसाठी रोजगार व व्यावसायीक संधी निर्माण करण्यासाठी वारसा स्थळाचा आराखडा तयार करताना विचार झाला पाहिजे. वारसा स्थळ म्हणून घोषित झाल्यावर ‘चांदर’ गावावर अनेकांची वक्रदृष्टी पडणार आहे. आपल्या गावच्या जागेवर डल्ला मारण्याचे अनेकजण मनसूबे बाळगणार आहेत. आपण सतर्क राहीलो तरत गाव वाचेल असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला. ग्रामपंचायतीने आराखडा तयार केल्यानंतर सरकारकडे त्याचा पाठपूरावा करण्याचे आश्वासन युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना दिले.









