उजव्या विचारसरणीच्या पक्षाला सर्वाधिक जागा
वृत्तसंस्था/ माद्रिद
स्पेनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने देशात राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत रुढीवादी पॉप्युलर पार्टीला (पीपी) सर्वाधिक मते मिळाली, परंतु मोठा विजय प्राप्त करण्याची आणि पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना सत्तेवरून हटविण्याची अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. अल्बर्टो नुनेज फीजू यांच्या नेतृत्वाखालील पीपीने सर्वाधिक जागा जिंकल्या असून सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना अन्य उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे.
सांचेझ यांची ‘स्पॅनिश सोशलिस्ट्स वर्कर्स पार्टी’ निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिली, परंतु या पक्षाने अन् त्याच्या सहकारी पक्षांनी निकालावर आनंद व्यक्त केला आहे. फीजू समर्थक आघाडीला 170 जागांवर विजय मिळाला आहे. तर बहुमतासाठी 176 चा आकडा गाठण्याची गरज आहे. पीपीच्या नेत्याने माद्रिदमध्ये स्वत:च्या समर्थकांना संबोधित करताना सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. स्पेनला राजकीय अनिश्चितता नको असल्याने कुणीच सरकार स्थापनेत अडथळे आणू नयेत असे वक्तव्य फीजू यांनी केले आहे. निवडणुकीत पीपीला 136 तर सोशलिस्ट पार्टीला 122 जागांवर विजय मिळाल्याचे समजते.
स्पेन आणि मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वत:चा कल स्पष्ट केले आहे. प्रतिगामी विचारसरणीचा गट आमच्या कामांना नाकारू पाहत होता, परंतु हा गट अपयशी ठरला आहे असे उद्गार सांचेझ यांनी माद्रिद येथील स्वत:च्या पक्ष मुख्यालयातून उपस्थित समर्थकांना संबोधित करताना काढले आहेत.
सांचेझ यांनी स्थानिक निवडणुकीनंतर स्पेनमध्ये मध्यावधी निवडणूक जाहीर केली होती. प्रत्यक्षात स्पेनमध्ये डिसेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार होती. स्पेनमध्ये पीपी या उजव्या विचारसरणीच्या पक्षाची सरशी झाल्याने युरोपीय महासंघाला हा एक प्रकारचा धक्का मानले जात आहे. स्पेनमधील नवे सरकार युरोपीय महासंघाच्या अटींना विरोध करण्याची शक्यता आहे.









