चार दिवस हलक्या स्वरुपात पाऊस
पणजी : पश्चिमी देशातून विशेषत: अरबी राष्ट्रांमधून मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग भारताच्या दिशेने सरकल्याने आज दि. 14 ते 17 मार्चपर्यंत गोव्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वऊपात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गोव्यात विजांच्या गडगडाटासह सर्वत्र पाऊस पडणार, असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे. सोमवारी तापमान थोडे कमी राहिले तरीदेखील पारा 36 डि.से.पर्यंत होता. आजपासून पारा थोडा खाली जाण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात हवामान खात्याने दि. 14 मार्चपासून हलक्या स्वऊपात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. गेले सलग तीन आठवडे राज्यातील तापमान बरेच वाढले होते. पारा 38 डि.से.च्याही पुढे गेला होता. असह्य उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील जनतेला सोमवारी किंचित दिलासा मिळाला. कमाल तापमान हे 36 डि.से. एवढे होते. पहाटे 22 डि.से. एवढे वातावरण गार होते. आजपासून राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याने तापमान आणखी खाली उतरणार आहे.
शेतकरीवर्गात चिंता
दरम्यान, खासगी पातळीवर सोशल मीडियावऊन गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असा इशारा देण्यात आल्याने आंबा व काजू बागायतदार चिंतेत आहेत. यंदा काजू थोडे उशिराने लागले. आंब्याला यंदा फारच उशीर झालेला आहे. आताशा उत्तर गोव्यातील आतील भागात आंब्याना मोहोर आलेला असून यंदा आंब्याचे फार उशिरा पीक येणार आहे. परंतु, आता पाऊस पडला तर आंब्याला आलेला मोहोर गळून पडणार व काजूचे सध्या बहरात आलेले उत्पादनही अडचणीत येण्याची शक्यता आहे.









