चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात आजपासून म्हणजेच दि. 2 ते 5 या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून त्या पार्श्वभूमीवर ’यलो अलर्ट’ जारी केला आहे.
शनिवारी राजधानीत 35.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सध्या राज्यभरात वातावरण दमट आणि बऱ्याच प्रमाणात उष्ण आहे. गत काही दिवसांपासून राज्यात तापमानात प्रचंड वाढ होत असून मान्सूनपूर्व पाऊस झालेला नसल्याने लोकांना काहिलीचे चटके सहन करावे लागत आहेत.
शुक्रवारी केरळसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्या राज्यामध्ये मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यापुढील दोन ते तीन दिवसात मान्सून कर्नाटक तसेच तामिळनाडूतील काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मात्र गोव्यात मान्सून कधी दाखल होईल यासंबंधी हवामान खात्याने अद्याप कोणताही अंदाज वर्तविलेला नाही. तरीही दि. 2 ते 5 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता दिसून आल्याने या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.









