सोमवार ठरला नोव्हेंबरमधील उकाड्याचा दिवस
पणजी : बंगालच्या खाडीबरोबरच आता अरबी समुद्रातही पावसाळी वातावरण आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने गोव्यातील तापमानात रविवारपासून वाढ होण्यास सुरुवात झाली. उद्या दि. 13 ते शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर या दरम्यान गोव्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरुपात आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नोव्हेंबरमधील कालचा सोमवार हा सर्वात उकाड्याचा दिवस ठरला आहे. सोमवारी पारा 34.80 डि.से. एवढा वाढला. रविवारी गोव्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण होते. सोमवारीदेखील ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा बराच वाढला आणि नागरिक हैराण झाले. अरबी समुद्रातील बदलत्या वातावरणामुळे गोव्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, उद्या दि. 13 पासून दि. 15 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात पाऊस पडणार आहे. दि. 15 नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस विजांच्या चकचकाटासह पडणार आहे व हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. गेले चार दिवस राज्यातील तापमान थोडे थंड होते मात्र अचानक रविवारपासून तापमानात बदल होत गेला. आठ दिवस गायब असलेला पाऊस पुन्हा डोके वर काढणार आहे. सध्या वाढता उकाडा हा चिंतेचा विषय ठरला आहे.









