वार्ताहर /नंदगड
नंदगड क्रॉस ते करंबळपर्यंत हल्याळ रस्त्यावर वळणे कमी करून डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकल्याने चिखल झाला आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गेल्या महिन्यापूर्वी खानापूर-हल्याळ रस्त्यावर वळणे कमी करण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढवून डांबरीकरण केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वळणे कमी केलेल्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भराव टाकण्यात आला होता. जोरदार पावसामुळे या मातीच्या भरावात चिखल झाला आहे. रस्ता अरुंद असल्याने वाहने बाजूला घेणेही कठीण झाले आहे. चिखलामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने चालक वाहने बाजूला घेत नसल्याने वाहतुकीत अडचण निर्माण झाली आहे. पाऊस झाल्यास हा चिखल रस्त्यावर येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.









