लंडन
सध्या यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची अॅशेस कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील झालेल्या चुरशीच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंचा 2 गड्यांनी पराभव करुन 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. आता या मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघामध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज रेहान अहमदचा समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड संघामध्ये आता अनुभवी फिरकी गोलंदाज मोईन अलीला 19 वर्षीय रेहान अहमदची साथ मिळणार आहे. रेहान अहमदने वयाच्या 18 व्या वर्षी गेल्या डिसेंबर महिन्यात पाक विरुद्धच्या सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले होते. इंग्लिश कौंटी स्पर्धेत लिसेस्टरशायर क्लबकडून खेळणाऱ्या रेहान अहमदने आपल्या कामगिरीत सातत्य राखत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील कराचीत झालेल्या पाक विरुद्धच्या सामन्यात रेहान अहमदने 7 गडी बाद केले होते. इंग्लंड संघातील अष्टपैलू मोईन अलीला पहिल्या सामन्यात खेळताना बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत लवकर बरी करुन घेण्यासाठी मोईन अलीचे प्रयत्न सुरु आहेत. या स्पर्धेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर येत्या बुधवारपासून खेळविला जाईल.
इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, अँडरसन, बेअरस्टो, ब्रॉड, ब्रूक, क्रॉले, डकेट, लॉरेन्स, पोप, पॉट्स, रॉबिन्सन, रूट, टंग, वोक्स, मार्क वूड