भारत-पाक सामन्याचे तिकीट केवळ तीन हजारात : सौदीमधील भारताचे सर्व सामने हाऊसफुल :
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. तर स्पर्धेत आठ विविध संघ सहभागी होणार आहेत, या सर्व संघांचे सामने पाकिस्तानात होणार आहेत तर भारतीय संघाचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील तीन सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.
पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीची तिकीट विक्री आधीच सुरू झाली आहे. आयसीसीने आता दुबईत होणाऱ्या भारताच्या सामन्यासाठीची तिकिटांची किंमत आणि तिकीट विक्रीची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे. दुबईत होणाऱ्या भारताच्या गट टप्प्यातील तीन सामन्यांची आणि पहिल्या उपांत्य फेरीची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.
विशेष म्हणजे, आयसीसीने जाहीर केलेल्या तिकीटांची किंमत ही पिझ्झा, बर्गरहून कमी असल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत माहितीनुसार तिकीटाचे किमान दर 1000 पाकिस्तानी रुपये अर्थात (310 भारतीय रुपये) निश्चित करण्यात आले असून, प्रिमियम श्रेणीतील तिकीट दर 1500 पाकिस्तानी रुपये म्हणजेच (465 भारतीय रुपये) इतक्या किमतीत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भारतीय चलनानुसार या तिकीटांची किंमत पाहिल्यास पिझ्झा आणि बर्गरपेक्षा कमी किमतीत क्रिकेट सामन्याची तिकीट मिळत आहेत. याशिवाय, व्हीआयपी तिकीटांचे दरही कमी ठेवण्यात आल्याने चाहत्याकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचे पीसीबीकडून सांगण्यात आले.
अवघ्या काही मिनिटांतच भारत-पाक सामना हाऊसफुल
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच संपल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले. हायब्रिड मॉडेलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत आणि पाक यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याची तिकिट विक्री सोमवारी सायंकाळी सुरु झाली. तिकिटाची सर्वात कमी किंमत 125 दिरहम म्हणजेच भारतीय चलनात 2964 रुपये होती. प्रीमियम लाउंजची किंमत 5000 दिरहम होती, जी भारतीय चलनात 1 लाख 18 हजार रुपये इतकी आहे. दरम्यान, सामन्याची तिकीटे न मिळाल्याने अनेक चाहत्यांची निराशा झाल्याचे पहायला मिळाले.









