वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोमवारी पुन्हा दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. सोमवारी सकाळी 11.15 च्या सुमारास ते दिल्ली विमानतळावर उतरले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार प्रतिनिधी सनद आचार्य, त्यांचा मुलगा आणि इतर तीन जण असल्याचे निदर्शनास आले. गेल्या काही दिवसातील त्यांचा हा दुसरा दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली जात असली तरी ते पक्ष बदलून भाजपच्या गोटात सहभागी होतात की नवा पक्ष स्थापन करतात याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
गेल्या आठवड्यात चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्त्वावर टीका करत आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच कोल्हन टायगर आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, आजतागायत चंपाई सोरेन किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणावर खुलासा केलेला नाही. चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देशभर आहे. यात तथ्य नसते तर भाजपने याला विरोध करणारे निवेदन नक्कीच दिले असते. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते मौन बाळगून आहेत.









