केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांचे अधिकारग्रहण समारंभात प्रतिपादन
बेळगाव : उद्योजक व व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स ही कणखर संस्था आहे. व्यापारी तसेच उद्योजकांना उद्योग-व्यवसाय चालवताना अनेक समस्या येत असतात. त्या दूर करण्यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न झाल्यास सरकारलाही मार्ग काढता येतो. त्यामुळे बेळगावच्या विकासासाठी चेंबर ऑफ कॉमर्सने सदैव पुढाकार घ्यावा,असे विचार केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी मांडले. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच केएलई शताब्दी सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक जयंत हुंबरवाडी, केएलईचे संचालक श्रीशैलप्पा मेटगुड, नूतन अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्योजक जयंत हुंबरवाडी यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या नूतन सदस्यांना शुभेच्छा देत चांगले काम करण्याची इच्छा असल्याचे यावेळी बोलून दाखविले.
अधिकारांचे हस्तांतरण
मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना अधिकारांचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, स्वप्नील शहा, सचिव राजेंद्र मुतगेकर, सहसचिव उदय जोशी, खजिनदार मनोजकुमार मत्तीकोप्प यासह सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अमित कणबर्गी व अभिषेक मुतगेकर यांनी केले. उदय जोशी यांनी आभार मानले.









