चलवादी सांस्कृतिक भवनसाठी 5 कोटी मंजूर करा
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या चलवादी लोकांना दोन एकर सरकारी जागा देऊन यामध्ये चलवादी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी चलवादी महासभेच्यावतीने सोमवारी सुवर्ण गार्डन परिसरात आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कर्नाटकात भेट दिलेल्या दहा स्थळांवर स्मारक बांधण्यात यावे. सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदे लवकर भरावीत, सुवर्णसौधसमोरील रस्त्याला ओनके ओब्बव्वा यांचे नाव द्यावे, आंबेडकर निगम मंडळाला अधिक अनुदान मंजूर करावे, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती मंजूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. चलवादी महासभेच्या बेळगाव विभागाचे अध्यक्ष दुर्गेश मेत्री यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी हनुमंत महाले, नारायण चलवादी, धनपाल अगशीमनी, सिद्धाप्पा मादार, कुमार दरबारे, कृष्णा कांबळे, डॉ. प्रल्हाद कांबळे यांसह इतर उपस्थित होते.









