गोव्यातील काजू-बियांचे कारखाने आता बाराही महिने उरलेले नाहीत. ते कारखाने टिकवून ठेवण्यासाठी सरकारला खास सवलत देण्याची गरज आहे. गोव्यात 2005 साली सुमारे 45 काजू बियांचे कारखाने होते, आता मागच्या दहा वर्षांत एकही नवा कारखाना आला नाही. आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सुमारे बारा वर्षांपूर्वी काजू बिया ज्या गोव्यात विक्रीस मिळत होत्या, त्या 80 टक्के गोव्याच्याच होत्या परंतु आता हे चित्र बदलले आहे.
आमच्या गोवा राज्यात वेगवेगळी फळे पिकतात आणि जिभेला रुची आणतात. आंबे, फणस, जांभूळ, जाम, चिकू, पपई, केळी, करवंदे, चुर्णा, जगमा, पेरू, अननस, कलिंगड तसेच अन्य फळे, रानमेवा खाऊन गोंयकार तृप्त होतो. एप्रिल-मे महिन्यात आंबे खाल्ले जातात तर कडक उन्हाळ्यात रसरशीत कलिंगडे जीवाला थंडावा देतात. गोव्यात असेच उन्हाळ्याच्या (गर्मीच्या) दिवसात मिळणारे उत्पन्न म्हणजे काजू पीक. गोवा सरकारच्या वन विकास महामंडळातर्फे येत्या शनिवार दि. 15 व रविवार दि. 16 एप्रिल रोजी ‘काजू फेस्त 2023’चे आयोजन पणजी कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर करण्यात आले आहे. गोव्यातील काजू पिकाला जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करून देण्याच्यादृष्टीने या काजू फेस्ताचे आयोजन करण्यात आल्याचे गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. देविया राणे यांनी सांगितले आहे. काजू हे गोव्यातील सर्वसामान्यांचे पीक आणि गरीबांबरोबरच धनिकांच्या पसंतीचा भाग. या काजू व्यवसायासमोर, व्यावसायिकांसमोर मोठ्या समस्या आहेत. त्या समस्यांवर मात करून या व्यवसायात मजल गाठण्याची गरज आहे.
गोव्यात सुमारे 1 लाख 50 हजार हेक्टर्स जमीन शेती उत्पादनाखाली आहे. त्यातून काजूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गोव्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काजूची लागवड करा, उत्पन्न मिळवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वारंवार सांगत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात काजूसाठी त्यांनी आधारभूत किंमतीचीही तरतूद केली आहे. कोरोना काळात गोव्यातील अनेक उद्योग, धंदे, व्यवसाय ठप्प झाले. गोव्याची मदार असलेल्या खाण, पर्यटन व्यवसायावरही गदा आली मात्र गोंयकारांना काजू व्यवसायातून तात्पुरते सावरले. अनेक कुटुंबे या काजू व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या पुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.
गोवा आणि काजू पीक असे समीकरण आहे. गोव्यात येणाऱ्या पाहुणेमंडळींना आदराची भेट म्हणून काजूगर दिले जातात. हेच काजू पीक आज गोंयकारांचे उत्पन्नाचे साधन बनले आहे. काजूची लागवड पहिली गोव्यात केली ती पोर्तुगीज मिशनरीज पाद्र्यांनी. त्यांनी ब्राझिल येथून काजू पीक गोव्यात आणले. गोव्याची डोंगराळ जमीन व्यर्थ न जाऊ देता सत्कारणी लागावी, हा हेतू होता. त्यावेळेपासून गोव्यात काजू पिकास सुरुवात झाली. हल्लीच्या काळात काजूची लागवड भारताच्या इतर भागात जसे की मध्यप्रदेश, छत्तीसगढ याठिकाणी होते. गोव्यातील उन्हाळा आणि दमट हवामान काजूला पोषक असते. गोव्यातील काजू-बियांना खूप मागणी आहे. गोव्यात येणारे अनेकजण गोव्याची आठवण म्हणून काजूगर घेऊन जातात. एकंदरित काजू पीक गोव्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत बनले आहे.
गोव्यात काजू बियांबरोबरच गोंयचो सोरो, हुर्राक आणि फेणी तेवढीच प्रसिद्ध आहे. या हुर्राकाचा, फेणीचा आस्वाद घेण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक खास गोव्यात येतात. गोव्याची ओळख हुर्राक आणि फेणी, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. काजूच्या बिया, हुर्राक आणि फेणी म्हटल्यावर गोव्याची छाती अभिमानाने फुलून येते मात्र दुसरीकडे काजू उत्पादन पुरेसे होत नसल्याची चिंताही आहे. गोव्याच्या कृषी खात्याच्या अंदाजानुसार गोव्यात वर्षाला 24 हजार टन काजूच्या बिया होतात. त्यावर प्रक्रिया करून शेवटी 5 हजार टन काजू-बिया उपलब्ध होतात. त्यातून थोड्याच प्रमाणात बिया निर्यात होतात. गोव्यात आवश्यक प्रमाणात काजू उत्पादन होत नसल्याने गुजरात, ओडिशा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि केरळ राज्यातून परप्रांतीय काजू-बिया गोव्यात विक्रीस येतात. गोव्यातील दूध व्यवसायाचीही हीच कहाणी आहे.
गोव्यातील काजू-बियांचे कारखाने आता बाराही महिने उरलेले नाहीत. ते कारखाने टिकवून ठेवण्यासाठी सरकारला खास सवलत देण्याची गरज आहे. गोव्यात 2005 साली सुमारे 45 काजू बियांचे कारखाने होते, आता मागच्या दहा वर्षांत एकही नवा कारखाना आला नाही. आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सुमारे बारा वर्षांपूर्वी काजू बिया ज्या गोव्यात विक्रीस मिळत होत्या, त्या 80 टक्के गोव्याच्याच होत्या परंतु आता हे चित्र बदलले आहे. पूर्वी ज्या बिया गोव्यात विक्रीस मिळायच्या, त्या 20 ते 25 टक्के बाहेरून आणलेल्या बिया असायच्या परंतु आता 50 टक्के काजूगर बाहेरून गोव्यात विक्रीस येतो, ही चिंताजनक बाब आहे. आफ्रिका, इंडोनेशिया, कोंगो, थायलंड, तान्झानिया येथून काजू बिया आयात होतात. हे काजू ‘गोवा काजू’ म्हणूनही विक्री केले जातात, अशी माहितीही उपलब्ध होते आहे. गोंयकारांना, पर्यटकांना या काजू-बिया ओळखणे कठीण होते. ज्या बिया आयात केलेल्या असतात त्या पांढऱ्याशुभ्र असतात व त्याला पाहून ग्राहक भूलतात. वास्तविक गोव्याच्या काजूची चवच न्यारी असते व हा भेसळयुक्त काजू तोंडात टाकल्यावर त्याची चव वेगळीच असते. ग्राहकाला हे समजत नाही. बाहेरून आलेले काजूगर ग्राहकांना स्वस्त दरात विकले जातात. गोव्याचा काजू महाग असतो. त्यामुळेच ग्राहक याकडे वळत नाही. परिणामी गोव्यातील काजू कारखान्यावरही संकट आले असून ते बंद पडत आहेत. गोव्याचा काजूगर आणि मुट्टे (बोंडू) यांना जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी गोवा सरकारने हल्लीच जिओग्राफिकल (जीआए) रजिस्ट्ररी यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. एकदा काय गोव्याच्या काजूगराला व बोंडूला वेगळी ओळख निर्माण झाली तर गोव्यातील काजू-बियांना चांगला भाव मिळू शकतो.
काजूची लागवड गोव्याच्या अर्थव्यवस्थेला थोडाफार हातभार लावते, असे म्हणायला हरकत नाही. काजूच्या हंगामात ग्रामीण लोकांना काम-धंदा लाभतो. काजूच्या पिकासाठी अनेक प्रक्रिया सुरू होतात. काजू काढणे, दारू काढणे, विकणे, खरेदी करणे आदी अनेक उद्योग-व्यवसाय सुरू होतात. यासाठी आवश्यक मनुष्यबळ लाभत नसल्याने कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड राज्यातील मजूर आणले जातात. वन खाते आपल्या ताब्यात असलेल्या काजूंचा लीलाव करते व त्यातून महसूल मिळविला जातो. काजूच्या बियांचा दर कमी असल्यास सरकार आधारभूत किंमत देते व काजू व्यावसायिकांना थोड्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून देते. सध्या काजूची लागवड कशी वाढवावी, याबाबत विचारमंथन होणे आवश्यक आहे. देशात काजू-बियांची आयात जास्त होते. भारतामध्ये 2019-20 साली काजू-बिया आयात करण्यासाठी सुमारे 8,800 कोटी रुपये खर्च केले तर 3800 कोटी रुपये हे बिया निर्यातीतून कमाविले. गोव्याचे उत्पादन 24000 टन आहे. काजू लागवडीत वाढ करून 37 हजार ते 40 हजार टन उत्पादन करणे आवश्यक आहे.
राजेश परब








