वृत्तसंस्था/ रायपूर
पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या चॅलेंजर चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद इंडिया ड संघाने पटकावले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंडिया ड संघाने इंडिया अ संघाचा सात गडय़ांनी दणदणीत पराभव केला. इंडिया ड संघातील रेणुका सिंगची भेदक गोलंदाजी तसेच यास्तिका भाटियाचे अर्धशतक ही वैशिष्टय़े ठरली.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया अ संघाने 20 षटकात 5 बाद 144 धावा जमवल्या. त्यानंतर इंडिया ड संघाने 19 षटकात 3 बाद 148 धावा जमवित हा सामना जिंकत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
इंडिया ड संघाने नाणेफेक जिंकून इंडिया अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. इंडिया अ संघातील हर्लेन देओलने 61 तर परवीनने 50 धावा जमवल्या. या जोडीने 105 धावांची भागीदारी केली. इंडिया ड संघातील रेणुका सिंगने ही जोडी फोडली. तत्पुर्वी रेणुका सिंगने इंडिया अ संघाची सलामीची जोडी शिवाली शिंदे आणि दिशा कसाट यांना लवकर बाद केले. कसाटने 19 धावा जमवल्या. शिवालीला खाते उघडता आले नाही. 4.4 षटकात इंडिया अ संघाची स्थिती 2 बाद 25 अशी होती. परवीनने 43 चेंडूत 50 तर हरलीनने 48 चेंडूत 61 धावा जमवल्या. रेणुका सिंगने 24 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर इंडिया ड च्या डावात यास्तिका भाटियाने 56 चेंडूत नाबाद 80 तर जेसिया अख्तरने 47 धावा झळकवल्या. 15 षटकाअखेर इंडिया ड ने 3 बाद 107 धावा जमवल्या होत्या. त्यांना शेवटच्या 4 षटकात विजयासाठी 38 धावांची जरुरी होती. भाटिया आणि सुष्मा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. सुषमाने नाबाद 13 धावा केल्या. इंडिया अ तर्फे पुनम आणि सायका यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः इंडिया अ 20 षटकात 5 बाद 144 (हरलीन देओल 61, परवीन 50, रेणुका सिंग 3-24), इंडिया ड 19 षटकात 3 बाद 148 (यास्तिका भाटिया नाबाद 80, अख्तर 47, सुषमा नाबाद 13, पूनम आणि सायका प्रत्येकी एक बळी).









