दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात 11 दिवसांनी कायदेशीर पावले उचलण्याची तयारी, न्यायालयाकडून 30 दिवसांची मुदत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मोदी आडनावासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना 23 मार्च रोजी दोषी ठरवले. त्यानंतर दुसऱयाच दिवशी म्हणजे 24 मार्च रोजी त्यांचे लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले. आता 11 दिवसांनंतर राहुल गांधी सुरतच्या सत्र न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल करणार आहेत. राहुल गांधी यांचे वकील सोमवार, 3 एप्रिलला न्यायालयात जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सुरतमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर जामीनही मंजूर केला. तसेच शिक्षेला 30 दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल यांना अटकेपासून संरक्षण मिळण्याबरोबरच निर्णयाविरोधात उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी महिन्याची मुदत मिळालेली आहे. आता महिन्याभरात त्यांना शिक्षेला स्थगिती मिळवून घ्यावी लागेल. शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांना कारागृहात कैद केले जाऊ शकते.
12 एप्रिलला पाटणा न्यायालयात हजेरी
आणखी एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना 12 एप्रिलला पाटणा न्यायालयात हजर राहायचे आहे. येथेही राहुल गांधी यांनी मोदी आडनाव असलेल्यांना चोर म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. राहुल गांधींवर वेगवेगळय़ा राज्यांमध्ये मानहानीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यापैकी एका प्रकरणात सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.









