वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्ले-ऑफच्या संदर्भात मागे पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज मंगळवारी लढत होणार असून या लढतीला फारसे महत्त्व नसले, तरी दोन्ही संघ त्यांच्या पुनर्बांधणी प्रक्रियेला गती देण्याचे उद्दिष्ट बाळगून उतरतील. कारण एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ स्वत:ला तऊण ब्रिगेडमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे.
मंगळवारचा सामना रॉयल्ससाठी 2025 च्या आवृत्तीतील शेवटचा सामना आहे. त्यांच्यासाठी वैभव सूर्यवंशीमध्ये अपवादात्मक प्रतिभा सापडण्याशिवाय आणखी फारसे काही अनुकूल घडलेले नाही. वैभवने क्रिकेट जगताला त्याच्या अनपेक्षित कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले आहे. मधल्या फळीच्या प्रभावहीन कामगिरीखेरीज लिलावात गोलंदाजीच्या बाबतीत खराब निवडीमुळे जयपूरस्थित संघाचे सर्वांत जास्त नुकसान झाले आहे. गोलंदाजांची खराब कामगिरी आणि वरच्या फळीतील फलंदाजांवरील अतिअवलंबन यामुळे 10 संघांमध्ये नवव्या क्रमांकावर विसावण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.
जोस बटलर संघातून गेल्याने आणि जोफ्रा आर्चरची कामगिरी फारशी प्रभावी नसल्याने रॉयल्सची स्थिती बिकट झाली आहे. विरोधी संघाला आव्हान देऊ शकणाऱ्या आघाडीच्या भारतीय गोलंदाजाची अनुपस्थिती ही त्यांच्यासाठी सर्वांत मोठी अडचण ठरली आहे. राजस्थानने काही वेळा धमाकेदार सुऊवात केली. उदाहरणार्थ रविवारी पंजाब किंग्सविऊद्ध त्यांनी पहिल्या पाच षटकांत 70 पेक्षा जास्त धावा केल्या, तरीही त्यांनी सामना गमावला. त्यामुळे आज ते उरलीसुरली प्रतिष्ठा राखण्यासाठी धडपडू शकतात.
दुसरीकडे, जुने, अनुभवी खेळाडू संघात भरून त्यांच्यावर अवलंबून राहण्याचा फॉर्म्युला जुना झाला असून त्याच्यामुळे या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीत गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. सीएसकेला राहुल त्रिपाठी आणि दीपक हुडा यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पण दबावाच्या परिस्थितीत सातत्याने सामना जिंकून देऊ शकणारे खेळाडू ते बनू शकलेले नाहीत. आयुष म्हात्रे, शेख रशिद आणि उर्विल पटेलसारख्या तऊण रक्ताच्या समावेशाने संघाची पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 20 वर्षीय म्हात्रे आरसीबीविऊद्ध शतक ठोकण्याच्या जवळ पोहोचला होता आणि हैदराबाद तसेच मुंबईविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केलेली आहे.
पटेल उशिरा आला आहे, परंतु त्याने केकेआरविऊद्ध आपली क्षमता दाखवली. कर्णधार ऋतुराज गायकवाडला गमवावे लागल्याने संघासमोरील संकट आणखी वाढले. अनेकांना आशा होती की, धोनी कर्णधार म्हणून परतल्याने संघाचे नशीब बदलेल. परंतु इतकी मर्यादित संसाधने हाताशी असताना तो फारसे काही करू शकलेला नाही. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रसारख्या परदेशी खेळाडूंकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु त्यांना प्रभाव पाडता आलेला नाही. पूर्वी शेन वॉटसन आणि ड्वेन ब्राव्हो यांनी संघाला तरता हात दिला होता. परंतु या हंगामात कोणीही त्यांच्यासारखे खेळलेले नाही.
संघ-चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), शेख रशिद, आयुष म्हात्रे, दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथीराना, अंशुल कंबोज, आर. अश्विन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, श्रेयस गोपाल, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, सी. आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अशोक शर्मा, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, शुभम दुबे, फजलहक फाऊकी, वानिंदू हसरंगा, शिमरोन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, रियान पराग, लुआन-ड्रे प्रिटोरियस, कुणाल सिंह राठोड, वैभव सूर्यवंशी, महेश थीक्षाना, युधवीर सिंग.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









