वृत्तसंस्था/ कोलंबो
आशिया चषक स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ स्तरावरील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशची गांठ आज शनिवारी येथे श्रीलंकेशी पडणार असून यावेळी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान बांगलादेशसमोर आसेल, तर श्रीलंकेसमोर विजयी सुऊवात करण्याचे लक्ष्य असेल. लाहोरमधील सुपर फोर स्तरावरील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने सात गडी राखून बांगलादेशला पराभूत केल्याने श्रीलंकेविरु द्ध आता त्यांना विजय अनिवार्य झाला आहे. आजच्या सामना होण्याच्या दृष्टीने हवामान पुरेसे कोरडे राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या सामन्यात बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागल्यास आशिया चषकातील त्यांची मोहीम जवळपास संपुष्टात येईल. फलंदाजी ही त्यांची मुख्य चिंता आहे. साखळी टप्प्यात जरी नजमल शांतो आणि मेहदी हसन मिराझ यांच्या शतकांच्या जोरावर त्यांनी अफगाणिस्तानविऊद्ध 5 बाद 334 धावा काढल्या असल्या, तरी श्रीलंका आणि पाकिस्तानच्या माऱ्याविरुद्ध त्यांना अनुक्रमे 164 आणि 193 अशी तुटपुंजी धावसंख्या उभारता आली.
श्रीलंकेकडील महीश थीक्षना, मथीशा पथिरानासारख्या गोलंदाजांचा संच बांगलादेशला त्रासदायक ठरू शकतो. पल्लेकेले येथे झालेल्या गट ‘ब’मधील साखळी सामन्यात बांगलादेशला 200 धावांच्या आंत रोखताना पथिराना व थीक्षना यांनी सहा बळी घेतले होते. श्रीलंकेच्या शेवटच्या साखळी सामन्यातील अफगाणिस्तानविऊद्धच्या विजयात वेगवान गोलंदाज कसून रजिथानेही मोलाची भूमिका बजावली होती. पण श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोरही जास्त धावा न देण्याचे आव्हान असेल. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी त्यांच्याविरुद्ध केवळ 37.4 षटकांत 289 धावा केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशला त्यांच्या फलंदाजीतील वरच्या फळीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
पण त्यांना शांतोची मदत मिळणार नाही, कारण तो धोंडशिरेच्या दुखापतीने आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यापूर्वी संघात सामील झालेला लिटन दास जास्त धावा करण्यात अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे त्यांना कर्णधार शकीब अल हसनवर जास्त अवलंबून राहावे लागेल. श्रीलंकाही त्यांचा कर्णधार दसुन शनाका आज चमकेल अशी अपेक्षा बाळगून असेल. शनाका फलंदाजी व गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो. बांगलादेशच्या गोलंदाजांपैकी तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम हे धोकादायक ठरू शकतात. परंतु त्यांची ती क्षमता अद्याप या स्पर्धेत दिसून आलेले नाही. असे असले, तरी या दोन संघांमध्ये आज एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.
संघ : बांगलादेश : शकिब अल हसन (कर्णधार), अनामूल हक बिजॉय, लिटन दास, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन ध्रुबो, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहदी हसन, नईम शेख, शमिम हुसेन, तन्झीद हसन तमीम, तन्झीम हसन साकीब.
श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करु णारत्ने, कुसल जेनिथ पेरेरा, कुसल मेंडिस, चारिथ असालंका, धनंजय डिसिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थीक्षना, दुनिथ वेललागे, मथिशा पथिराना, कसून रजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशन.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.









