कोल्हापूर- सांगली सीमेवर चक्काजाम आंदोलन; रस्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प
Raju Shetti शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Farmers Association) वतीने आज राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलेला आहे. याचाच भाग म्हणून कोल्हापूर ( Kolhapur ) जिल्ह्यातील जयसिंगपूर (Jaysingpur) नजीकच्या अंकली फाट्या जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या रस्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सध्या बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास न करता हे आंदोलन करण्याची खबरदारी घेण्यात आली. वीज तोडणी, ऊस तोडणी, मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी अश्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करणाऱ्या मंत्री उदय सामंत यांच्यावर शेट्टी यांनी पलटवार केला आहे. 50 खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करू नये नेमकी स्टंटबाजी कोण करते हे पुढील काळात कळेल असा टोला मंत्री उदय सामंत यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आहे.