रत्नागिरी, प्रतिनिधी
पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देऊन चाकरमानी मुंबईला परतु लागले आहेत. मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागलेल्या या चाकरमान्यांमुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.प्रचंड गर्दीमुळे कोकण रेल्वेला आरपीएफचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला आहे.शनिवारी झालेल्या गौरी गणपती विसर्जनानंतर त्याच दिवशी सायंकाळपासून चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी मिळेल ती गाडी पकडून मुंबईच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे.कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली,रत्नागिरी, संगमेश्वर,चिपळूणसह खेड स्थानकावर रविवारी विसर्जनानंतरच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
गणेशोत्सवाला गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेने नियमित गाड्यांसोबतच गणपती स्पेशल गाड्यांच्या शेकडो फेऱ्यांचे नियोजन केले आहे.मात्र, वाहतुकीवरील ताण वाढल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत आहेत