लावणीसमाज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या जीवनावर कार्यक्रम : लोकमान्य रंगमंदिरमध्ये आयोजन
बेळगाव : लावणीतील ‘भाव’ आवाज व शब्दफेकीतूनच व्यक्त व्हायला हवेत. याचे प्रत्यंतर देत लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी फडातील लावणी घराघरात पोहोचवून तिला दर्जा दिला. लावणीमधील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून शारदोत्सव सोसायटीच्या ‘चैत्रोत्सव’मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित ‘माझं गाणं माझं जगणं’ हा नृत्य, नाट्या व गायनाविष्कार सादर झाला. लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी प्रा. विजया धोपेश्वरकर यांचे ‘मराठी साहित्यातील बदलती लावणी’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर सुलोचना यांच्यावरील कार्यक्रमाला सुरुवात झाली. योगिता हुंचीकट्टी यांनी सुलोचना यांच्या भूमिकेतून त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास साभिनय उलगडला. भूपाळी, मोर नाचरा हवा, फड तुऱ्याला गं आला, कसं काय पाटील, कळीदार कपुरी पान, खेळताना रंग बाई होळीचा या लावण्यांवर महिला कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार केला. गायिकांनी सुलोचना यांच्या लावण्यांचे सुरेल गायन केले. समारोपावेळी सुलोचना यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्याचा प्रसंग प्रत्ययकारी ठरला. नीता कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित सांघिक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.









