हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली; चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसरात भाविकांची दाटी; दर्शन रांगेत हजारो भाविक
प्रतिनिधी / पंढरपूर
चैत्रवारीचा भक्तीसोहळा आज रविवारी अध्यात्माची दक्षिण काशी असणाऱ्या पंढरीमध्ये मोठ्या भक्तिभावाने होत आहे. हा नयनरम्य भक्तिसोहळा आपल्या नयनांमध्ये साठविण्यासाठी आणि पांडुरंगाच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. या भाविकांकडून होणाऱ्या हरिनामाच्या जयघोषामुळे अवघी पंढरी भक्तिरसाने नाहून निघत आहे.
आज रविवारी पहाटे एकादशींच्या महापूजेनंतर भक्ती सोहळयाला सुऊवात होईल. दिवसभर हरिनामाचा गजर, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नानामध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर मग्न असताना दिसून येणार आहेत.
मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे विठ्ठलाची दर्शनरांग आज गोपाळपूररोडच्या पत्राशेडपर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यामुळे दर्शनासाठी सरासरी 9 ते 10 तासांचा कालावधी लागत आहे. तर मुखदर्शन अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये होत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी संपूर्ण दर्शनमंडपामध्ये मोठया प्रमाणावर पिण्याचे पाणी व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
आजच्या एकादशीच्या सोहळ्यासाठी एसटी प्रशासनाकडून सोडण्यात आलेल्या जादांच्या एसटी बस तसेच रेल्वेकडील विशेष रेल्वेगाड्या यांच्यामधून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात उशिरापर्यंत दाखल झालेले आहेत. याशिवाय आज देखिल दिवसभरामध्ये अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक भाविक हे खासगी वाहनाने देखील पंढरपुरात येऊन दाखल होत आहेत.
वारीच्या निमित्ताने सध्या पंढरपुरात होत असलेल्या गर्दीने संपूर्ण पंढरपूर हाऊसफुल्ल झाले आहे. यामध्ये चंद्रभागेच्या पैलतीरावर असणाऱ्या 65 एकरमधील सर्व प्लॉट भाविकांनी पकडलेले आहेत. याठिकाणी साधारणपणे एक ते दीड लाखाच्या आसपास भाविक दाखल झाले आहेत.
चंद्रभागा वाळवंटात भाविकांची दाटी……
ऐन एकादशी दिवशी चंद्रभागेतील स्नानाला अध्यात्मामध्ये मोठे महत्त्व असल्याने पंढरीत दाखल झालेल्या भाविकांकडून चंद्रभागा स्नानासाठी वाळवंटामध्ये गर्दी केली जात आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट सध्या भाविकांनी फुलून गेले आहे. तर स्नानासाठी नदीपात्रामध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर भाविकांच्या या ठिकाणच्या गर्दीमुळे या परिसरातही व्यवसाय वारी भरली आहे.