रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणं श्रुयताम्।
अम्बोदा: बहवा: सन्ती गगने सर्वेपि नैतादृशा:।।
केचिद् वृष्टिभि: आर्द्रयन्ती धरणिं( वसुधां) गर्जयन्ती केचिद् वृथा ।
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरत: मा ब्रूहि दीनं वच:।।
सरलार्थ – अरे मित्रा चातका, एक क्षणभर माझे सांगणे ऐक, आभाळात खूप ढग असले तरी ते एकसारखे नाहीत, काही जमीनीवर वृष्टी करून जमिनीला आर्द्रता देतात, तर काही उगाचच वायफळ गर्जना करतात. म्हणून तुला सांगतो, उगाच जो जो दिसेल त्याच्यापुढे दीनवाणे होऊन याचना करू नकोस.
हे वाचलं आणि एकदम खांडेकरांचे दोन मेघ ही कथा डोळ्यासमोर आली. सध्या एप्रिल महिना असला तरी गडगडणारे ढग आवाज करत मध्येच पावसाच्या सरी टाकून जात आहेत. चैत्र पालवीची चाहूल वाळलेल्या काटक्मया फांद्या खरंतर मोहरून येण्याचा हा कालखंड पण शिशिरात झालेली पानगळ कुठेतरी मनाला एक दुखरी जागा ठेवून गेलेली असते. उन्हाचा तडाखा वाढतो आणि जीवजंतू, मनुष्यप्राणी कासावीच व्हायला लागतात पण पुढचे सगळे ऋतू कल्पनेनेच गारवा देऊन जात असतात. अशातच माहेरची ओढ मनाला हुरहुर लावते तर सासरची जबाबदारी सारखी डोळ्यासमोर दिसत असते. दोन्ही हात पसरून उभ्या असलेल्या या ऋतूंना अशावेळी जर का आभाळ भरून आलं, पावसाची शक्मयता निर्माण झाली तर आपली अवस्था फार विचित्र होऊन जात असते. म्हणजेच आभाळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करावे की करू नये अशा मनस्थितीत असलेल्या व्यक्तीसारखी होते. बरोबर आनंद झाल्यासारखं दाखवायचा पण चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजी उमटलेली दिसते तसेच काहीसं आहे.
आपण आपल्या नातेवाईकात किंवा मित्रमंडळींमध्ये हे असे अनुभव खूप जवळून घेत असतो. आपला मोठेपणा मिळवण्यासाठी बोलावणे सगळ्यांना करतो पण एखादा गरीब किंवा कमी पैसेवाला किंवा समाजात ज्याला फारसे स्थान नसलेला आला तर त्याला जशी सतत टाळण्याची वागणूक आपण देत असतो तसंच काहीसं ह्या अवेळी आलेल्या पावसाचं होतं. त्याच्या स्वागताची तयारी नसते. त्याच्याबरोबर फोटो काढायला कोणी तयार नसतं किंवा आपल्यासारख्या श्रीमंतांचेच कम्पू करून स्वत:ला धन्यवाद फोटो काढत मिरवत राहण्यात काही ढग तिथे समाधान मानत असतात. अशी ही अवस्था त्या आकाशातल्या मेघांचीसुद्धा झालेली असते. निळे मेघ अगदी सजून धजून आकाशात आनंदाने बागडत असतात. एकमेकांच्या हातात फेर धरून नाचत असतात. गात असतात. मध्येच एखादी वीज येऊन या सगळ्यांचे सुंदर फोटो काढून जात असते. आपल्यासारख्या निष्ठावान व्यक्तीचे हात धरून त्याला पुढे येऊ न देण्याचं काम प्रत्येक जण करत असतात. त्या ढगाच्या अगदी जवळ शेजारून जरी चालत गेलो तरी ढगाला टाळण्याचं किंवा त्याला बघून न बघितल्या सारखं करण्याची वृत्ती या मिरवणारा ढगांमध्ये दिसते. वेळ प्रसंगी हे निळे ढग काळ्या ढगाला हिणवतातसुद्धा. पण काळा ढग शांतपणे आपला मार्ग आक्रमित असतो. क्षणभर दुखावल्याची भावना त्याच्या मनात येऊन जाते पण पुढच्या क्षणाला त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव चालायला प्रेरणा देते. त्याच्याकडे निळ्या ढगांसारखा सुंदर रंगही नसतो. वैभवही नसतं. त्याच्या जवळून उडणाऱ्या पक्षांच्या रांगाही नसतात कारण त्याला नक्की माहिती असतं की यातलं आपल्याबरोबर शेवटी काही येणार नाही. हा काळा ढग मस्त मजेत डुलत डुलत चाललेला असतो. खरं तर तो हे सर्व क्षण मनात भरभरून साठवत असतो. एवढ्यात स्वर्गाच्या कमानी लांबूनच दिसायला लागतात. निळ्या पांढऱ्या ढगांची तिथे गर्दी उसळलेली असते. आपल्याला सर्वांना इथे जायला मान मिळणार यासाठी प्रत्येक जण अगदी निश्चित असतो. काळा ढग मात्र कधी आपल्याला त्या स्वर्गाच्या कमानीपर्यंत जाता येईल याची वाट पाहत असतो.








