खेलो इंडिया पॅरा स्पर्धा, दिल्ली 2025 : अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 3 सुवर्णांसह 1 रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 100 मीटर शर्यतीत अकोलाच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीत कराडचा साहिल सय्यद, पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरने सुवर्ण यशाला गवसणी घातली. चैतन्य हा रिक्षा डायव्हरचा मुलगा असून बारावीच्या परिक्षेला दांडी मारुन त्याने खेलो इंडिया स्पर्धेची पात्रता फेरीतही यश संपादन केले होते.

जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वातील खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत जय महाराष्ट्राचा सूर निनादला. अकोला शहरातील रिक्षा चालकाचा मुलगा असणाऱ्या चैतन्य पाठकने 100 मीटर धावणे टी 13 प्रकारात सुवर्ण धाव घेतली. 11.59 सेकंदात शर्यत पुर्ण करीत चैतन्यने पदार्पणातच सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला. 35 टक्के डोळ्याने अधू असलेल्या चैतन्यने महिन्याभरापूर्वीच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण यश संपादून खेलो इंडिया स्पर्धेची पात्रता फेरी गाठली होती. या स्पर्धेमुळे बारावीच्या समाजशास्त्रच्या पेपरला दांडी मारून त्याने सुवर्ण यशाला गवसणी घातली होती. चैतन्यचे वडिल विजय पाठक हे अकोल्यात प्रवाशी रिक्षा चालवितात तर आई स्वच्छता कर्मचारी आहे.
कराडच्या साहिल सय्यदला गोल्ड
क्रिकेटपटू ते गोळाफेकपटू असा प्रवास करणाऱ्या कराडच्या साहिल सय्यदने एफ 64 गोळाफेकीत सुवर्णपदकाचा पल्ला पार केला. वैयक्तिक चौथ्या फेरीत 9.57 मीटरची सर्वात्तम फेकी करून कराडच्या साईलने सोनेरी यशाचे शिखर गाठले. 26 वर्षीय साईल व्हिलचेअर क्रिकेटमध्ये अनेकवर्ष रमला होता. दोन वर्षापासून त्याने गोळाफेक व थाळीफेक स्पर्धेकडे लक्ष दिले. पुण्यातील सणस मैदानात प्रशिक्षिका सोनिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाव्दारे वर्षभरातच त्याने राष्ट्रीय स्पर्धेत पदकाची जादू घडविला. पाठोपाठ आता पर्दापणातच खेलो इंडिया स्पर्धेतही सुवर्ण यश संपादन केले.
गोळाफेकमध्ये महाराष्ट्राची सुवर्ण‘सिद्धी
अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेक एफ 56 प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णसह रौप्यपदक पटकावले. पुण्याची सिद्धी क्षीरसागर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. पुण्याच्या 20 वर्षीय सिद्धीने अंतिम फेरीत 5.88 मीटर गोळाफेक करीत अव्वल स्थान पटकावले. 5.63 मीटर गोळा फेकणारी महाराष्ट्राचीच मीनाक्षी जाधव रौप्यपदकाची मानकरी ठरली. तमिळनाडूच्या लिझी वेलू हिने (4.95 मीटर) कांस्यपदक मिळवले. 2016 मध्ये विषाणूजन्य आजारामुळे पाठीखालील भाग अधू झाल्यावरही हार न मानता सिद्धीने वडील विकास क्षीरसागर यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आयुष्याशी दोन हात करण्याची जिगर दाखवली. यंदा फेब्रुवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले. या आधारावर तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली.









